मुंबई : भारतीय हवामान विभागाने राज्यासाठी पुन्हा एकदा इशारा वर्तवला आहे. १७ ते २१ ऑगस्टदरम्यान पुणे घाट परिसरासह कोकण-मराठवाड्यात अतिवृष्टीची शक्यता असून, पुणे घाट भागाला ‘रेड अॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे. याचबरोबर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाट व कोल्हापूर घाट भागासाठी ‘ऑरेंज अॅलर्ट’ देण्यात आला आहे.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात दरड कोसळणे, नद्या-नाल्यांना पूर येणे आणि सखल भागात पाणी साचणे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासन तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, रायगडमधील कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली, तर रत्नागिरीतील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. खेड-दापोली मार्ग पाण्याखाली गेला असून वाहतूक विस्कळीत झाली आहे.
हवामान खात्याने कळवले आहे की, मध्य भारतात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, मुंबई महानगर प्रदेश, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिवसह पश्चिम महाराष्ट्रात १८ व १९ ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. खान्देश व उर्वरित मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.
या अतिवृष्टीमुळे धरणसाठ्यात वाढ होऊन नद्या ओसंडून वाहण्याची, तसेच नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याशिवाय, समुद्र खवळलेला राहील व ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
- शक्यतो घराबाहेर अनावश्यक प्रवास टाळावा.
- नदीकाठ, धरण परिसर, डोंगराळ भागात जाणे टाळावे.
- मोबाईलवर जिल्हा प्रशासन व हवामान खात्याच्या अपडेट्सवर लक्ष ठेवावे.
- आपत्कालीन परिस्थितीत त्वरित स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम असल्याने, पुढील काही दिवस नागरिकांनी सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक असल्याचे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे.