पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाची चिन्हं? ‘टपका रे टपका’ गाण्यावरून खुनाचा संकेत, आंदेकर-कोमकर वादाचा नवा अध्याय



पुणे :
पुण्यातील नाना पेठ परिसरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा थरार पाहायला मिळाला आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होत असतानाच, त्यांच्या भाच्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली असून, आयुष उर्फ गोविंद गणेश कोमकर (वय १९) असे या मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयुष कोमकर हा क्लासमधून घरी परतत असताना, घराच्या खालील बेसमेंटमध्ये दोघा अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. अकरा गोळ्या झाडण्यात आल्या असून, त्यातील तीन गोळ्या आयुषला लागल्या. तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले असले तरी, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

डीजेवर गाणं आणि खुनाचा ‘संकेत’

या हत्याकांडाला अधिक थरारक बनवणारी बाब म्हणजे खुनाआधी हल्लेखोरांनी डीजेवर खास गाणं वाजवण्याचा ‘संकेत’ दिला. जवळच्या गणेश मंडळाच्या डीजेवर त्यावेळी “टपका रे टपका, एक ओर टपका” हे गाणं लावण्यात आलं. हे गाणं सुरू असतानाच गोळीबार झाला.
गाण्यातील “चार में से एक गया, तीन का ये मटका” या ओळींवरून स्थानिकांमध्ये चर्चा सुरू आहे की, हा खून फक्त सुरुवात असू शकतो आणि पुढे आणखी तीन खून होऊ शकतात. मात्र पोलिसांनी याबाबत कसलीही पुष्टी केलेली नाही.

आंदेकर विरुद्ध कोमकर वाद

या खुनामागे जुना वैमनस्याचा सूड असल्याचा पोलिसांना संशय आहे. आयुष कोमकरचा वडील गणेश कोमकर सध्या तुरुंगात असून, तो माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा मुख्य आरोपी आहे. आयुष हा आंदेकर यांचा भाचा देखील होता. त्यामुळे, ही हत्या ‘खून का बदला खून’ या सूडभावनेतून घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

पोलिसांची कडक भूमिका

या हत्येनंतर पुण्यातील गुन्हे शाखा सतर्क झाली आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले की, आरोपींच्या शोधासाठी सहा पथके तैनात करण्यात आली आहेत. गुन्हेगारांना इशारा देताना ते म्हणाले,
“चुकीला माफी नाही. कोणताही गुन्हा करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा. दोषींना कठोर शिक्षा होईल.”

पुढे काय?

नाना पेठसारख्या गर्दीच्या भागात डीजेवर गाणं लावून खुनाचा इशारा देत थेट गोळीबार होणे, हा प्रकार पुणेकरांसाठी धक्कादायक आहे. आंदेकर-कोमकर टोळी वाद पुन्हा पेटण्याची भीती व्यक्त केली जात असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


Leave a Comment