पुण्यात सायबर चोरट्यांचा कहर! ज्येष्ठ नागरिक व तरुणाची तब्बल ४१ लाखांची फसवणूक


पुणे – शहरात सायबर चोरट्यांकडून फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि एका तरुणाची तब्बल ४१ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये चोरट्यांनी गुंतवणूक व ऑनलाइन कामाचे आमिष दाखवून पीडितांकडून मोठी रक्कम उकळली आहे.

प्रकरण १ – शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष
सहकारनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनकवडी भागातील एका ज्येष्ठ नागरिकाला गेल्या वर्षी मोबाईलवर संदेश पाठवून चांगल्या परताव्याचे आमिष दाखविण्यात आले. सुरुवातीला त्यांनी थोडी रक्कम गुंतवली असता, चोरट्यांनी काही परतावा दिला आणि त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीत ज्येष्ठांनी वेळोवेळी ३० लाख ४५ हजार रुपये गुंतवले. मात्र नंतर कोणताही परतावा न देता चोरट्यांनी संपर्क तोडला. त्यांचा मोबाईल क्रमांक बंद असल्याचे आढळल्यानंतर ज्येष्ठांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार या प्रकरणाचा तपास करत आहेत.

प्रकरण २ – ऑनलाइन टास्कच्या नावाखाली गंडा
विमानतळ पोलिसांकडे नोंदविण्यात आलेल्या दुसऱ्या फिर्यादीत, एका तरुणाला ऑनलाइन पद्धतीने काम व चांगल्या उत्पन्नाचे आमिष दाखविण्यात आले. सुरुवातीला काही परतावा मिळाल्याने तरुणाचा विश्वास बसला आणि त्याने हळूहळू १० लाख ६७ हजार रुपये चोरट्यांच्या खात्यात जमा केले. मात्र नंतर कोणताही परतावा न मिळाल्याने आणि संपर्क तुटल्याने फसवणुकीचे गांभीर्य लक्षात आले. पोलीस निरीक्षक शरद शेळके या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांचा इशारा
सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी, अनोळखी व्यक्तींकडून मिळालेल्या गुंतवणूक किंवा ऑनलाइन कामाच्या ऑफरवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोणतीही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी त्याची पूर्ण पडताळणी करणे गरजेचे आहे.

Leave a Comment