सांगली काँग्रेसला जबर धक्का : जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित

सांगलीच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घटना बुधवारी घडणार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे 31 जुलै रोजी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असून, हा प्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना काँग्रेससाठी ही अत्यंत धक्कादायक घटना ठरणार आहे. सांगलीतील काँग्रेस शहर व जिल्हा संघटनांमध्ये पृथ्वीराज पाटील हे महत्वाचे नेतृत्व होते. त्यांच्या जाण्यामुळे काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीला मोठा फटका बसणार आहे.

पाटील यांच्यासोबत आणखी काही स्थानिक नेते व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामध्ये यापूर्वी महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये काम केलेले नेतेही आहेत. या प्रवेशामुळे भाजपची सांगली जिल्ह्यातील ताकद भक्कम होण्याची शक्यता आहे.

भाजपकडून हा पक्षप्रवेश सोहळा भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला असून, रवींद्र चव्हाण यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील इतर वरिष्ठ नेते देखील उपस्थित राहणार आहेत.

या घडामोडींनी सांगलीतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपची घोडदौड आणखी वेग घेईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Leave a Comment