दूध व्यवसायासाठी २० लाख कर्ज व ७ लाख अनुदान; जिल्हा बँकेचा प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात सहभाग

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात सहभागी होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना म्हैस व गाय खरेदीसाठी साधारणपणे २० लाख रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सुमारे ६.५ ते ७ लाख रुपयांचे अनुदान देखील मिळणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष तथा मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

या निर्णयामुळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, ग्रामीण भागातील रोजगार वाढीस चालना मिळणार आहे. या योजनेंतर्गत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम फक्त राज्य शासनाच्या अनुदानावर आधारित असून त्यात दुग्ध व्यवसायाचा समावेश नाही. मात्र, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात म्हैस व गाय खरेदीसाठी कर्ज आणि अनुदान देण्याची तरतूद आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा मुद्दा संचालक मंडळाच्या बैठकीत आला होता. मात्र, सर्व संचालकांनी एकमताने हा विषय फेटाळून लावला. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यावर सध्या तरी पडदा पडला आहे.

या बैठकीत संगणक सल्लागार कंपनीच्या मुदतवाढीबाबतही चर्चा झाली. यासोबतच बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख ८ सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे.

तसेच गोकुळप्रमाणे जिल्हा बँकेतून कर्ज घेणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना जातिवंत म्हशीसाठी १०,००० रुपयांचे विशेष अनुदान देण्याबाबत देखील सकारात्मक चर्चा झाली असून, यावर लवकरच अंतिम निर्णय होणार आहे.

या बैठकीला उपाध्यक्ष राजूबाबा आवळे, संचालक सतेज पाटील, निवेदिता माने, संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, अर्जुन आबिटकर, रणजित पाटील, राजेश पाटीलभैया माने उपस्थित होते.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य आणि रोजगाराच्या नव्या संधी देणारा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Leave a Comment