पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली; राधानगरी धरणाचा विसर्ग घटला, पुढील पावसाचा अंदाज जाहीर


कोल्हापूर – सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून आज सकाळी 6.00 वाजता नदीने इशारा पातळी गाठली आहे. पंचगंगा नदीची पातळी सध्या 39 फूट 3 इंच झाली असून, इशारा पातळी 39 फूट व धोका पातळी 43 फूट आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कता वाढली आहे. सध्या 85 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

दरम्यान, राधानगरी धरणाचे सातपैकी पाच दरवाजे बंद करण्यात आले आहेत. धरणातून सुरू असलेला विसर्ग 10 हजार क्युसेकवरून कमी होऊन 4356 क्युसेक झाला आहे. यामध्ये स्वयंचलित दरवाज्यांमधून 2856 क्युसेक व BOT पॉवरहाऊसमधून 1500 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यात पावसाचा जोर लवकरच कमी होण्याची शक्यता आहे.

  • 21 ऑगस्टपासून ट्रफ लाईन उत्तरेकडे सरकल्याने पावसाचे प्रमाण घटेल व काही ठिकाणी सूर्यदर्शन होईल.
  • 25 ते 27 ऑगस्टदरम्यान राज्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
  • 2 सप्टेंबरला बंगालच्या उपसागरात कमी दाब तयार होण्याची शक्यता असून, त्यामुळे 3 ते 4 सप्टेंबरपासून राज्यात पाऊस होऊ शकतो.
  • 22 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबरदरम्यान परतीचा (रिटर्न) मान्सून पाऊस राहू शकतो.

कृषी तज्ञांनी इशारा दिला आहे की, पावसाच्या उघडीपीदरम्यान तापमान वाढल्यास आद्रतेमुळे कापूस व इतर पिकांवर थ्रिप्स, पांढरी माशी यांसारख्या कीटकांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य कीटकनाशकांची फवारणी करून पिकांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

Leave a Comment