नाशिकमध्ये ‘पैसे दुप्पट’ आमिषातून मोठी सायबर फसवणूक; तिघांना अटक



नाशिक : ‘आभासी गुंतवणूक करून १४ दिवसांत पैसे दुप्पट करा’ अशा आमिषाने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत नाशिक सायबर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या टोळीने एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम गोळा करून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी शिंदे (३१, रा. मालेगाव), संदीप मत्साळकर (रा. इंदिरानगर), विष्णू पाटील (५०, रा. मालेगाव), प्रमोद बिल्लाडे उर्फ क्षत्रिय (४१, रा. इंदिरा नगर), आणि चेतन महाजन (३४, रा. देवळा) या पाच जणांनी ‘Open Hands’ नावाचे संकेतस्थळ तयार केले. या वेबसाइटच्या माध्यमातून लोकांना केवळ १२ ते १४ दिवसांच्या कालावधीत गुंतवलेली रक्कम दुप्पट करून मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले.

ऑनलाइन मिटिंग्सद्वारे ही योजना जाहीर करण्यात आली. सोशल मीडियाचा वापर करत अनेक गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचून त्यांना “डिजिटल अरेस्ट” किंवा इतर कायदेशीर अडचणींचा धाक दाखवून रक्कम उकळण्यात आली. यानंतर काही दिवसांतच वेबसाइट बंद करण्यात आली आणि संबंधित व्यक्ती गायब झाल्या.

या प्रकरणी नाशिक सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमधील तिघांना अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस कोठडी मंगळवारी (५ ऑगस्ट) संपणार आहे. उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

या फसवणुकीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी पुन्हा एकदा नागरिकांना अशा लुबाडणाऱ्या ऑनलाईन योजनांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

सायबर पोलिसांचा इशारा:

  • “जलद नफा” देणाऱ्या कोणत्याही स्कीमकडे आंधळेपणाने गुंतवणूक करू नका.
  • फसवणुकीसंदर्भात शंका असल्यास तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधा.
  • अधिकृत वेबसाइट व प्रमाणित प्लॅटफॉर्मवरच गुंतवणूक करा.



Leave a Comment