मुंबई
नाशिक ते अक्कलकोट प्रवास आता अवघ्या ४ तासांत शक्य होणार आहे. चेन्नई ते सुरत या महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पांतर्गत हा नवा महामार्ग बीओटी (Build-Operate-Transfer) तत्वावर उभारण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मार्फत या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार असून, केंद्र सरकारने याला मान्यता दिली आहे.
हा महामार्ग दोन टप्प्यांत उभारण्यात येणार आहे:
- पहिला टप्पा: नाशिक ते औंध – सुमारे १९२ किलोमीटर
- दुसरा टप्पा: औंध ते अक्कलकोट – सुमारे २२२ किलोमीटर
एकूण ४१४ किलोमीटरचा हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर नाशिक ते अक्कलकोट हे अंतर फक्त चार तासांत पार करता येणार आहे. सध्या या मार्गासाठी आठ ते नऊ तासांचा कालावधी लागतो, त्यामुळे वेळ आणि इंधन दोन्हींची बचत होणार आहे.
या महामार्गाचा प्रवास अनेक जिल्ह्यांमधून जाणार आहे — नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर आणि अक्कलकोट (सोलापूर जिल्हा). त्यामुळे पर्यटन, व्यापार आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल.
महत्त्वाचे म्हणजे, हा महामार्ग दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरशी जोडलेला असणार आहे. यामुळे महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातून थेट मोठ्या शहरांशी संपर्क सुकर होईल. सुरत ते चेन्नई दरम्यानचा प्रवास सुकर करण्याच्या दृष्टीने हा महामार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.
बीओटी मॉडेलखाली हा प्रकल्प राबवण्यात येणार असून, खासगी कंपन्यांना मार्ग उभारणीसाठी जबाबदारी दिली जाईल. सरकारकडून भूसंपादन आणि नियोजनाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.