नालासोपारा: सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे अनेकदा वाद, धमक्या आणि गुन्हे घडताना दिसतात. अशीच एक धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली असून, केवळ इन्स्टाग्रामवर तरुणीला मेसेज पाठवण्याच्या कारणावरून एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक वाघे नावाच्या तरुणाने एका तरुणीला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवला. हा मेसेज पाहून त्या तरुणीच्या प्रियकराला प्रचंड राग आला. प्रियकर भूषण पाटील याने काही मित्रांना सोबत घेतलं आणि प्रतिकला गाठत त्याच्यावर थेट हल्ला केला.
मोरेगाव तलावाजवळ प्रतिकला अडवण्यात आलं. त्याच्याशी वाद घालून भूषण पाटील आणि त्याचे साथीदारांनी त्याला बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे, या मारहाणीचा व्हिडीओही आरोपींनी बनवला होता. प्रतिक गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावरच कोसळला. स्थानिकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तुळींज पोलिसांनी त्वरीत कारवाई करत भूषण पाटील, संकेत पाटील, स्वरूप मेहेर यांच्यासह एकूण 7 आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
ही घटना सोशल मीडियावरून होणाऱ्या गैरसमज आणि हिंसाचार किती टोकाला जाऊ शकतो याचं गंभीर उदाहरण आहे. केवळ एका मेसेजमुळे एका तरुणाचा बळी गेला असून समाजात मोठी खळबळ उडाली आहे.