Mumbai High Court ने मनोज जरांगे आंदोलनाला सुनावलं फटकार, दिला मोठा आदेश



मुंबई : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या आंदोलनावर आज मुंबई उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत कोर्टाने आंदोलनावर अनेक महत्त्वाचे निर्बंध आणि आदेश दिले आहेत.

सुनावणीदरम्यान कोर्टाने स्पष्टपणे सांगितले की, आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये. आंदोलकांच्या संख्येबाबत देखील कोर्टाने कडक निर्देश दिले असून, ५ हजारांपेक्षा जास्त लोक या आंदोलनात सहभागी होऊ नयेत, ही आयोजकांची जबाबदारी असल्याचे नमूद केले.

याशिवाय, आमरण उपोषणाला सुरुवातीपासूनच परवानगी नव्हती आणि पहिल्याच दिवशी संध्याकाळी ६ नंतर मैदान रिकामे करणे आवश्यक होते, असा थेट उल्लेखही कोर्टाने केला. मात्र, सध्या आझाद मैदान परिसरात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक उपस्थित आहेत.

सीएसएमटी परिसरातही आंदोलकांचा मोठा जमाव दिसत आहे. या ठिकाणाहून आंदोलकांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रेल्वे स्टेशन परिसरात आंदोलक कबड्डी, खो-खो खेळताना, तसेच रस्त्यावर आंघोळ करतानाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पसरले आहेत.

आंदोलनामुळे जनजीवन ठप्प – वकील सदावर्ते

हायकोर्टात या प्रकरणावर युक्तिवाद करताना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलनामुळे मुंबईतील महत्वाच्या रुग्णालये आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होत असल्याचे अधोरेखित केले.
त्यांनी न्यायालयात सादर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमधून आंदोलक सीएसएमटी परिसरात रेल्वे ट्रॅकवर उतरलेले, रस्ते अडवलेले आणि गाड्यांची तोडफोड करताना दिसत असल्याचे दाखवले.

सदावर्तेंनी सांगितले की, सीएसएमटी परिसर हे अतिसंवेदनशील ठिकाण असून तिथे आंदोलन केल्यामुळे रुग्णालयांची सेवा, रेल्वेची वाहतूक आणि संपूर्ण यंत्रणा ठप्प होत आहे. आंदोलक रेल्वेच्या फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, एसी डब्यात मुक्तपणे फिरताना दिसतात आणि वाहनधारकांना अनधिकृत चौकशी करतात, अशी माहिती त्यांनी न्यायालयाला दिली.

पुढील सुनावणी उद्या

आजची सुनावणी पूर्ण झाली असून, पुढील सुनावणी उद्या दुपारी ३ वाजता होणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी न्यायालयाचा अंतिम आदेश काय असेल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


Leave a Comment