मिरा रोड | शेअर बाजारात ऑनलाइन गुंतवणुकीचे आमिष दाखवत मिरा रोडमधील एका महिलेला तब्बल ४० लाख ७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मिरा रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणूक झालेल्या महिलेचे नाव सहाना अंगगर असे असून, त्या संड स्टोन को-ऑप सोसायटी, मिरा रोड येथे राहतात. १७ जून ते २६ जुलै २०२५ दरम्यान त्यांनी शेअर बाजारातील ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती.
शैलेंद्रकुमार सोनकर (वय ४७) असे फसवणूक करणाऱ्याचे नाव असून, तो बेव्हर्ली पार्क येथे वास्तव्यास होता. त्याने सहानाला ‘चांगला नफा मिळवून देतो’ असे सांगत एक लिंक पाठवली. त्या लिंकवर क्लिक करून ‘शेअर ट्रेडिंग अॅप’ डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. नंतर त्या अॅपद्वारे शेअर्स खरेदी-विक्री सुरू केल्यानंतर नियमितपणे पैसे भरण्यास सांगण्यात आले.
पीडित महिलेने वेळोवेळी गुंतवणुकीच्या नावाखाली एकूण ४०,०७,७०० रुपये पाठवले. मात्र काही दिवसांनी संबंधित व्यक्तीने पैसे परत देणे थांबवले आणि संपर्कसुद्धा बंद केला. यामुळे फसवणूक लक्षात आल्यावर सहाना यांनी मिरा रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेघना बुरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, ऑनलाइन फसवणुकीसंदर्भात नागरिकांनी अधिक जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.