मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे यांचं अखेर कृषी खाते काढून घेण्यात आलं आहे. त्यांची जागा आता पक्षाचेच दुसरे वरिष्ठ नेते दत्ता भरणे यांनी घेतली असून, महाराष्ट्राचे नवे कृषी मंत्री म्हणून त्यांची गुरुवारी मंत्रालयाने अधिकृत घोषणा केली आहे.
सदर निर्णयाचे मुख्य कारण ठरले पावसाळी अधिवेशनादरम्यान कोकाटे यांचा ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हायरल झालेला व्हिडिओ. या प्रकारामुळे विधानसभेत मोठा गदारोळ झाला होता. विरोधकांनी “रमी खेळणारे मंत्री नकोत” असा नारा देत कोकाटे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती.
मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर, राजीनामा न घेता केवळ खात्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून घेत त्यांना क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ खाते देण्यात आले आहे.
दोन दिवसांपासून चर्चेत असलेला हा खातेबदलाचा निर्णय गुरुवारी रात्री उशिरा सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचना जारी करून अधिकृत करण्यात आला.
दत्ता भरणे आणि माणिकराव कोकाटे हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) चे असल्यामुळे खाते बदल सुलभतेने पार पडला, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कृषी खात्याचे नेतृत्व आता भरणे यांच्याकडे असल्यामुळे पुढील धोरणांवर लक्ष केंद्रित होणार आहे.
कोकाटे यांच्यावरील वाद अद्यापही शांत झालेला नसला तरी सरकारने या निर्णयातून सध्याच्या राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.