राज्यातील महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र, या योजनेवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. विरोधकांचा आरोप आहे की ही योजना मतांच्या स्वार्थासाठी सुरू केली असून, लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यावरच सत्ताधाऱ्यांनी हा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देताना सांगितले की, “लाडकी बहीण योजना इतक्या व्यापक प्रमाणात राबवली जाईल, अशी अपेक्षा विरोधकांना नव्हती.” शिंदे यांनी स्पष्ट केले की आचारसंहिता लागू होऊन पैसे देता येणार नाही म्हणून महिलांना ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबर महिन्याचे पैसे देण्यात आले. तसेच, निवडणुका लक्षात घेऊन डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच दिले जातील असेही त्यांनी जाहीर केले.
शिंदे यांनी या योजनेला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाचा उल्लेख करत, “आमच्या लाडक्या बहिणींसाठी आम्ही केवळ 1500 रुपयांपुरते मर्यादित राहणार नाही तर, त्यात वाढ करून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील,” असे सांगितले. विरोधकांनी या योजनेच्या विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असला, तरी या योजनेवर कोणतीही बंदी आणता येणार नाही, असेही शिंदे यांनी ठामपणे नमूद केले.
त्यांनी मोदी सरकारचे समर्थन करत असेही सांगितले की, “केंद्राने दिलेला एक रुपया लोकांपर्यंत तसाच पोहोचतो, याकडे आम्ही लक्ष ठेवत आहोत.” विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना शिंदे यांनी हे स्पष्ट केले की, विरोधक या योजनेला विरोध करतात पण, महिलांमध्ये या योजनेबद्दल असलेल्या विश्वासामुळे हे विरोधक निवडणुकीत पराभूत होतील.
1 thought on “माझी लाडकी बहीण योजना: नोव्हेंबरमध्ये ‘या’ दिवशी १५०० रुपये जमा – महिलांसाठी आनंदाची बातमी!”