महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गणरायाच्या आगमनाआधीच राज्यात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) 26 ऑगस्ट रोजी तब्बल 17 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर
मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण राहणार असून अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.
- कमाल तापमान: 28°C
- किमान तापमान: 24°C
मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन
पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असून पुणे शहरात मध्यम पाऊस पडेल. सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
उत्तर महाराष्ट्रात विजांचा कडकडाट
धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला असून, या भागात विजांसह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
मराठवाड्यात पावसाचा इशारा
हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि परभणी या जिल्ह्यांत मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात मुसळधार सरी
नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाचा अंदाज आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.
नागरिकांना सूचना
हवामान विभागाने नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः विजांचा कडकडाट होत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबू नये. नदी, नाले व धरण परिसरात नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या पावसामुळे नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करताना हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.