३५ वर्षांची साथ संपली: नांदणी मठातील ‘महादेवी’ हत्तीण वनताराकडे रवाना, सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय

कोल्हापूर | प्रतिनिधी
नांदणी मठात गेली ३५ वर्षे सांभाळली गेलेली हत्तीण ‘माधुरी’ ऊर्फ ‘महादेवी’ हिला अखेर गुजरातमधील जामनगर येथील ‘वनतारा’ प्राणी कल्याण केंद्रात पाठवण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मोकळा झाला. न्यायालयीन प्रक्रियेचा शेवट करत सर्वोच्च न्यायालयाने मठाने दाखल केलेली याचिका फेटाळली आणि मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला.

महादेवीची ही निरोपाची वेळ अत्यंत भावनिक ठरली. सोमवारी मठातील धार्मिक विधींनंतर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. हजारो नागरिक उपस्थित होते, महिला भावुक झाल्या होत्या, आणि गावकऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते.

हत्तीण सोडून जात असल्याच्या बातमीने पंचक्रोशीत शोककळा पसरली. गावकऱ्यांनी ‘महादेवी’च्या पायावर पाणी घालून औक्षण केले. काहींनी “ती आमच्या घरचीच आहे” अशा भावना व्यक्त करत ती गुजरातला जाणार यावर नाराजीही दर्शवली.

याचवेळी जमाव आक्रमक बनल्याने दगडफेक झाली आणि दोन पोलिस वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांनी लाठीमार करत जमावाला ताब्यात घेतले. या घटनेने प्रशासनाच्या बंदोबस्ताच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

या याचिकेचा उगम प्राणी हक्कासाठी कार्य करणाऱ्या संस्थेच्या तक्रारीमधून झाला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, महादेवी हत्तीणीच्या कल्याणासाठी अधिक चांगले पर्यावरण आणि उपचार वनतारात मिळू शकतात. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने महादेवीला वनतारात पाठवण्याचे आदेश दिले.

महास्वामी जिनसेन भट्टारक पट्टाचार्य यांनी न्यायालयाचा निर्णय मान्य असल्याचे जाहीर केले. मात्र त्यांनी अधिक प्रतिक्रिया देण्याचे टाळले. गावकऱ्यांना शांततेचे आवाहन करत, “महादेवीचे भवितव्य सुरक्षित आणि सुखी असावे,” असा संदेशही दिला.

महादेवीच्या डोळ्यांतही अश्रू:
महादेवीला मठात परत आणल्यानंतर, तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहताना अनेकांनी पाहिले. तिच्या भावनिक नाळेची गावकऱ्यांशी असलेली वीण या प्रसंगात प्रकर्षाने जाणवली.

एक पर्व संपले:
नांदणी मठासाठी आणि संपूर्ण गावासाठी महादेवी केवळ एक प्राणी नव्हती, तर ती एक श्रद्धेचा आणि स्नेहाचा प्रतीक होती. तिच्या जाण्याने गावात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तरीही, प्राणी हक्कांच्या दृष्टिकोनातून हा निर्णय महादेवीच्या दीर्घायुष्यासाठी योग्य ठरेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Leave a Comment