कोल्हापूर | नांदणी मठातील महादेवी हत्तिणीला गुजरातमधील वनतारा अभयारण्यातून परत आणण्याच्या मागणीने कोल्हापूर जिल्ह्यात वातावरण तापले असताना, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत निर्णय होणार की नाही, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, या संपूर्ण प्रकरणात शासनाने कुठलाही थेट आदेश दिलेला नाही. भाविकांच्या भावना लक्षात घेऊन ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, “हा सरकारचा निर्णय नव्हता. हत्तिणीच्या देखरेखीवरून न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेमुळे न्यायालयाने उच्चाधिकार समिती नेमली होती. त्यांनी महादेवीला अभयारण्यात पाठवण्याची शिफारस केली होती, जी नंतर उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केली.”
फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्रात हत्तिणीसाठी आवश्यक त्या प्रकारचे अभयारण्य नसल्यामुळे तिला गुजरातमधील ‘वनतारा’ येथे हलवण्यात आले. वन विभागाने फक्त न्यायालयाच्या निर्देशानुसार आवश्यक कागदपत्रे सादर केली होती.
या बैठकीला अनेक महत्त्वाचे राजकीय नेते आणि मंत्र्यांची उपस्थिती असणार आहे. यामध्ये उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री गणेश नाईक, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, विशाल पाटील, माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार विनायक कोरे, सतेज पाटील, अमल महाडिक, विश्वजीत कदम, अशोक माने, राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे व अन्य नेते सहभागी होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी ठाम भूमिका घेत सांगितले की, “महादेवी ही नांदणी मठाची आणि कोल्हापूरकरांच्या श्रद्धेची बाब आहे. आम्ही काहीही झाले तरी महादेवीला परत आणल्याशिवाय शांत बसणार नाही. उपमुख्यमंत्र्यांनी यावर ठोस निर्णय घ्यावा.”
महादेवी हत्तिणीबाबतचा निर्णय धार्मिक भावना, वन्यजीव रक्षण आणि न्यायालयीन प्रक्रिया यांमधील समतोल राखण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे फडणवीस यांच्या बैठकीत नक्की काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
