मुंबई : देशभरातील गणेशभक्तांच्या श्रद्धेचं केंद्र असलेला लालबागचा राजा दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य मिरवणुकीसह विसर्जनासाठी निघाला. लालबागच्या मंडपापासून गिरगाव चौपाटीपर्यंतचे अंतर केवळ 8 किलोमीटर असले तरी हा प्रवास पूर्ण करायला तब्बल 20 ते 24 तासांचा वेळ लागतो. लाखो भाविकांच्या गर्दीत हा प्रवास अत्यंत संथ गतीने होतो. यामागे केवळ गर्दीच नाही, तर परंपरांचाही मोठा वाटा आहे.
चला पाहूया लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब होण्यामागील 5 खास परंपरा :
1. शेजारच्या गणपतीनंतरच प्रस्थान
लालबागच्या राजाचा रथ बाहेर पडण्यापूर्वी शेजारील गणेश गल्लीचा गणपती प्रथम मार्गस्थ होतो. अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही जपली जाते. त्यामुळे राजाच्या मिरवणुकीला सुरुवात होण्यास उशीर होतो.
2. परिसरातून मिरवणूक
मंडपातून बाहेर आल्यानंतर राजा प्रथम लालबाग व आसपासच्या परिसरात तीन-चार तास मिरवणूक करतो. रस्त्यांवर हजारो भाविक नाचगाणं, गुलाल आणि फुलांनी बाप्पाचं स्वागत करतात.
3. मुस्लीम समाजाचं स्वागत
लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत एक अनोखा सोहळा पाहायला मिळतो. भायखळा स्टेशनजवळ हिंदुस्तानी मशिदीजवळ मुस्लीम बांधव मिठाई वाटतात, तर दोन टाकी भागात भक्तांना शाही सरबत देऊन स्वागत करतात. धार्मिक सौहार्दाचं हे सुंदर उदाहरण प्रत्येक वर्षी पाहायला मिळतं.
4. फायर ब्रिगेडची सलामी
मिरवणूक जेव्हा मुंबई फायर ब्रिगेड मुख्यालयासमोरून जाते, तेव्हा फायर इंजिनचे सायरन आणि लाल दिवे सुरू करून राजाला सलामी दिली जाते. ही परंपरा पाहण्यासाठी हजारो लोक जमलेले असतात.
5. कोळी समाजाचा निरोप
गिरगाव चौपाटीवर पोहोचल्यावर कोळी समाज आपल्या रंगीबेरंगी बोटींनी बाप्पाला निरोप देतो. पारंपरिक पद्धतीने सलामी दिल्यानंतर मूर्तीला खोल समुद्रात विसर्जन केले जाते.
यंदा समुद्राच्या भरतीमुळे विसर्जनाची प्रक्रिया आणखी दीर्घ झाली. सकाळी 10 वाजता निघालेली मिरवणूक दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत चालूच राहिली. लाखो भाविकांच्या जयघोषात बाप्पाला निरोप देण्यात आला.
लालबागच्या राजाच्या विसर्जनाची ही परंपरा केवळ धार्मिक विधी नसून मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐक्याच्या परंपरेचं अनोखं दर्शन घडवते.