मुंबई:
राज्यातील लाखो महिलांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याचा हफ्ता अद्याप मिळालेला नसल्याने महिलांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. मात्र आता रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर हा जुलै महिन्याचा हफ्ता लवकरच खात्यात जमा होणार असल्याची महत्त्वाची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हफ्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ९ ऑगस्टपर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही महिलांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने ही आर्थिक मदत वेळेवर मिळावी, यासाठी राज्य सरकारने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या हफ्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
महिलांचा विश्वास वृद्धिंगत
राज्य शासनाच्या या वेळी दिलेल्या घोषणेमुळे आणि अंमलबजावणीमुळे लाभार्थी महिलांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. अनेक महिलांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया देत, रक्षाबंधनासारख्या सणाच्या तोंडावर आलेल्या या मदतीचे स्वागत केले आहे.
योजना कशासाठी?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी सुरू करण्यात आलेली असून, पात्र महिलांना दरमहा ठराविक आर्थिक सहाय्य मिळते. ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा आणि त्यांच्या आत्मनिर्भरतेला चालना देण्याचा उद्देश बाळगून राबवली जात आहे.
लाभार्थींनी काय करावं?
ज्या महिलांना अद्याप हफ्ता प्राप्त झाला नाही, त्यांनी काही काळ प्रतीक्षा करावी. येत्या ९ ऑगस्टपर्यंत सर्वांच्या खात्यात रक्कम जमा होईल. खात्यात पैसे न आल्यास आपल्या जवळच्या महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधावा, अशी सूचना देण्यात आली आहे.