सांगली, दि. 20 ऑगस्ट 2025 – सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे कृष्णा खोऱ्यातील धरणांचा विसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोयना व वारणा धरणातून वाढता पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीची पाणीपातळी सांगलीत धोकादायक पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे.
कोयना धरणातून सध्या तब्बल 95 हजार क्युसेक विसर्ग सुरू असून पावसाचा जोर कायम राहिल्यास हा आकडा कधीही एक लाख क्युसेकांवर जाऊ शकतो. नवजा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत 202 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सांगलीत पाणी आधीच 25 फुटांवर पोहोचले असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार दुपारी ते 35 फूट आणि संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत तब्बल 40 फूट होण्याची शक्यता आहे. कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने विसर्ग सतत सुरू ठेवावा लागत आहे.
दरम्यान, चांदोली (वारणा) धरणातून 38 हजार क्युसेक पाणी कृष्णा नदीत सोडले जात आहे. त्यामुळे वारणा नदी कृष्णेला मागे ढकलत असून परिस्थिती गंभीर होत आहे. याशिवाय अलमट्टी धरणावरही वाढत्या विसर्गाचा ताण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही परिस्थिती कायम राहिल्यास सांगलीत पुन्हा महापुराचे संकट गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
