पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर; कोयना धरणातून 67,700 क्युसेक्स विसर्ग, कृष्णा नदीची पातळी 35 फुटांवर जाण्याची शक्यता


दि. 19 ऑगस्ट 2025 | पश्चिम महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना व वारणा धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. या वाढीव विसर्गामुळे कृष्णा नदीची पातळी तब्बल 32 ते 35 फुटांपर्यंत जाण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

सध्या कोयना धरणातून 55 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू असून, आज सकाळी 11 वाजेपासून अतिरिक्त सहा वक्र दरवाजे 9 फुटांपर्यंत उघडण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण 65,600 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. याशिवाय, कोयना जलविद्युत प्रकल्पातील दोन युनिटमधून 2,100 क्युसेक्स पाणी नदीत सोडले जात आहे. एकूण मिळून 67,700 क्युसेक्स विसर्ग सुरू झाला आहे.

वारणा व इतर धरणांमधूनही विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा आणि कराड परिसरातील नदीकाठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

यामुळे संबंधित तालुक्यांतील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पूरग्रस्त भागात गरज पडल्यास नागरिकांना स्थलांतरित करण्याची तयारी स्थानिक प्रशासनाने केली आहे.


Leave a Comment