पुणे: कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या IT क्षेत्रात कार्यरत २५ वर्षीय तरुणीवर बनावट कुरिअर बनून घरात शिरलेल्या व्यक्तीकडून बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (२ जुलै) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे. या घटनेने पुणे शहरात खळबळ उडवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता कल्याणीनगर येथील आयटी कंपनीत काम करते आणि गेल्या दोन वर्षांपासून कोंढव्यातील एका नामांकित सोसायटीत भावासोबत राहते. घटनेच्या दिवशी तिचा भाऊ परगावी गेला होता आणि ती घरी एकटी होती.
दरवाजावर टकटक झाल्यावर पीडितेने सेफ्टी डोअर उघडले. आरोपीने कुरिअर कंपनीतून आलो असल्याचे सांगून तिच्या घरात प्रवेश मिळवला. त्यानंतर त्याने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून तिला बेशुद्ध केलं आणि तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने तिचे फोटोही काढले आणि “मी परत येईन” असा धमकीचा मेसेज मोबाइलमध्ये लिहून ठेवला.
घाबरलेल्या पीडितेने तात्काळ कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी २८ ते ३० वयोगटातील अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर शहरातील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
टिप: बंद घरातही महिलांना सुरक्षित वाटत नसेल, तर हे समाज आणि प्रशासनासाठी चिंतेचे कारण आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी तत्काळ ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.