कोल्हापूर/कुरुंदवाड: कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत पूरनियंत्रणासाठी महाराष्ट्र रिझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (MRDP) अंतर्गत बुधवारी जिल्ह्यातील सहा नद्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. पंचगंगा, कृष्णा, भोगावती, तुळशी, दूधगंगा आणि वेदगंगा या नद्यांच्या विविध महत्त्वाच्या बिंदूंवर अत्याधुनिक ड्रोन, सेन्सर उपकरणे आणि सॅटेलाइट नकाशांचा वापर करून हे सर्वेक्षण पार पडले.
या प्रकल्पामध्ये पावसाळ्यातील पूरस्थिती नियंत्रित करणे, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्याचा मोठा उद्देश आहे. जागतिक बँकेच्या २,३३८ कोटींच्या आर्थिक सहाय्यासह आणि राज्य शासनाच्या ८६२ कोटींच्या गुंतवणुकीने एकूण ३,२०० कोटींचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
या अंतर्गत, नद्यांच्या प्रवाहाची दिशा, खोली, वेग, विसर्गाचा वेग, पाणी परसरण यांचा अभ्यास करण्यात येत आहे. यासाठी ‘एक्सप्लोर ट्रॅक्ट बेल’ या कंपनीने ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विस्तृत सर्वेक्षण केले.
बुधवारी झालेल्या कामामध्ये पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा, शिवाजी पूल, पंचगंगा घाट, पुणे-बंगळूर महामार्गावरील पंचगंगा पूल येथे सर्वेक्षण पार पडले. कृष्णा नदीवरील औलरवाड-नुसिंहवाडी पुलाजवळ, दूधगंगा नदीवरील वंदूर व करनूर भागात, वेदगंगा नदीवरील भोजवाडी बंधारा, तर तुळशी नदीवरील बीड बंधारा परिसरात देखील अभ्यास झाला.
या महत्त्वपूर्ण सर्वेक्षणात पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अजय पूंदेकर, दादासो पुजारी, सतीश उपाध्ये, स्वप्नील कुंभार, दादासाहेब तांबे आदी अधिकारी उपस्थित होते.