भारतातील न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण क्षण 17 ऑगस्ट 2025 रोजी कोल्हापूरमध्ये घडला. भारताचे मुख्य न्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन सर्किट बेंचचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे तब्बल 43 वर्षांपासून सुरू असलेला लढा अखेर यशस्वी ठरला. हे सर्किट बेंच 18 ऑगस्ट 2025 पासून प्रत्यक्ष कार्यरत झाले आहे.
या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूरच्या ऐतिहासिक राधाबाई बिल्डिंगमध्ये हे बेंच स्थापन करण्यात आले असून, हीच ती वास्तू आहे जी 1931 साली छत्रपती राजाराम महाराजांनी आपल्या भगिनींच्या स्मरणार्थ उभारली होती.
सर्किट बेंचची रचना
कोल्हापूर सर्किट बेंचसाठी चार न्यायमूर्तींसह एकूण 68 प्रशासकीय अधिकारी व 125 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
- 1 डिव्हिजन बेंच : न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक व न्यायमूर्ती शर्मिला देशमुख
- 2 सिंगल बेंचेस : न्यायमूर्ती शिवकुमार दिगे आणि न्यायमूर्ती एस.जी. चपळगावकर
या बेंचकडे कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांचा अधिकार क्षेत्र असेल.
अधिसूचना आणि कायदेशीर चौकट
राज्य पुनर्रचना कायदा 1956 मधील अधिकारांचा वापर करून हे सर्किट बेंच स्थापन करण्यात आले आहे. अधिसूचना दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध झाली असून त्यावर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी स्वाक्षरी केली आहे.
सर्किट बेंच म्हणजे काय?
सर्किट बेंच म्हणजे न्यायालयाचे एक तात्पुरते ठिकाण, जेथे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या शिफारसीनुसार आणि राज्यपालांच्या अधिसूचनेनंतर न्यायालयीन कामकाज चालते.
खंडपीठ विरुद्ध सर्किट बेंच
- सर्किट बेंच – तात्पुरते स्वरूप, राज्यपाल अधिसूचना प्रसिद्ध करतात.
- खंडपीठ (Permanent Bench) – कायमस्वरूपी स्वरूप, सर्वोच्च न्यायालयाच्या मंजुरीनंतर राष्ट्रपती अधिसूचना काढतात.
मुंबई उच्च न्यायालयाची माहिती
- स्थापना : 14 ऑगस्ट 1862
- पहिले मुख्य न्यायाधीश : सर मैथ्यु रीचर्ड
- पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश : एम.सी. छागला
- पहिली महिला मुख्य न्यायाधीश : न्यायमूर्ती सुजाता मनोहर
- विद्यमान मुख्य न्यायाधीश : आलोक आराधे (48 वे)
मुंबई उच्च न्यायालय खंडपीठे
- नागपूर – 9 जानेवारी 1936
- छत्रपती संभाजीनगर – 27 ऑगस्ट 1982
- पणजी (गोवा) – 30 ऑक्टोबर 1982
- कोल्हापूर – 18 ऑगस्ट 2025 (सर्किट बेंच)
ऐतिहासिक महत्त्व
भारतातील सर्वात पहिले उच्च न्यायालय कलकत्ता (1862) येथे स्थापन झाले होते. सध्या देशभरात एकूण 25 उच्च न्यायालये आहेत. कोल्हापूर सर्किट बेंच कार्यान्वित झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील लाखो नागरिकांना मुंबईपर्यंत धाव घ्यावी लागणार नाही, हे या भागासाठी मोठे पाऊल मानले जात आहे.