कोल्हापूर : कोल्हापूरकरांची दीर्घकाळची प्रतिक्षा संपुष्टात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या नव्या इमारतीचे भव्य उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरन्यायाधीशांनी फित कापून व कोनशिलेचे अनावरण करून न्यायप्रक्रियेच्या नव्या अध्यायाला प्रारंभ घडवून आणला.
या ऐतिहासिक सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे, सार्वजनिक आरोग्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबिटकर, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती शिवकुमार दिगे, न्यायमूर्ती शमीला देशमुख, न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर, न्यायमूर्ती भारती डांगरे आदी न्यायमूर्तींसह जिल्हा न्यायालयातील मान्यवर सुद्धा उपस्थित होते.
या कार्यक्रमाला आमदार चंद्रदीप नरके, आमदार शिवाजी पाटील, ज्येष्ठ संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, जिल्हाधिकारी अमोल येडे, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त के. मंजुलक्ष्मी, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.
सीपीआर रुग्णालयासमोर उभारण्यात आलेल्या या सर्किट बेंचसाठी राज्य सरकारने तब्बल 46 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिस विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही इमारत पूर्णत्वास आली आहे.
या नव्या इमारतीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील न्यायप्रक्रियेची गती वाढणार असून नागरीकांना जलद व सुलभ न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. न्यायव्यवस्थेच्या बळकटीसाठी आणि लोकांना सोयीस्कर सुविधा मिळाव्यात यासाठी ही इमारत एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याचे सरन्यायाधीश गवई यांनी या वेळी व्यक्त केले.