सोलापूर
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना – खरीप हंगाम 2025 साठी पीक पाहणी प्रक्रिया 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली असून ती 14 सप्टेंबर 2025 पर्यंत राबवली जाणार आहे. ही पाहणी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असून नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाई, पीक विमा, शासकीय अनुदान व इतर लाभ घेण्यासाठी ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे.
ई-पीक पाहणी अॅपद्वारे घरबसल्या नोंदणी
शेतकऱ्यांना आता मोबाईलच्या सहाय्याने स्वतःच पीक पाहणी करता येणार आहे. महसूल विभागाने ई-पीक पाहणी मोबाईल अॅपचे व्हर्जन 4.0.0 गुगल प्ले स्टोअरवर अपडेट केले आहे. या अॅपद्वारे 7/12 उताऱ्याच्या आधारे आपल्या शेतात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल विभागाच्या माहिती तंत्रज्ञान कक्षाच्या संचालक सरिता नरके यांनी केले आहे.
सहाय्यक स्तरावरील पाहणी 15 सप्टेंबरपासून
पीक पाहणीची दुसरी टप्पा म्हणजे सहाय्यक स्तरावरील पाहणी, जी 15 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबर 2025 दरम्यान होणार आहे. मात्र, शेतकऱ्यांनी फक्त सहाय्यकांवर अवलंबून न राहता शक्य असेल तेवढी पाहणी स्वतः पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
डिजिटल क्रॉप सर्वे प्रणालीचा प्रभाव
2024 च्या रब्बी हंगामापासून महाराष्ट्रात पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सर्वे प्रणालीद्वारे राबवली जात आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या प्रकल्पात सतत सुधारणा केल्या जात असून 15 ऑगस्ट 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रकल्प सक्रीय होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी मदतीसाठी सहाय्यक उपलब्ध
पीक पाहणी करताना अडचणी आल्यास, प्रत्येक गावासाठी नेमणूक केलेले सहाय्यक पहिल्याच दिवसापासून मदतीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही शंका अथवा अडचण असल्यास स्थानिक सहाय्यकांशी संपर्क साधावा.