सांगली – सांगलीतील राजकारणात हलकल्लोळ निर्माण करणाऱ्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृतपणे पूर्णविराम दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना मागील काही आठवड्यांपासून वेग मिळाला होता.
मात्र मुंबईत अण्णासाहेब डांगे यांच्या भाजपा प्रवेश कार्यक्रमात उपस्थित असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्टपणे सांगितले की, “सांगलीतील भाजप प्रवेश सध्या तरी झालेला नाही.” यामुळे जयंत पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाल्याचे संकेत मिळाले आहेत.
अण्णासाहेब डांगे, चिमण डांगे आणि विश्वास डांगे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. हे सर्व डांगे कुटुंबीय जयंत पाटील यांचे जवळचे मानले जातात, त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशानंतर जयंत पाटीलही भाजपमध्ये येणार का, अशी चर्चा रंगली होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात जमिनीवर काम करणारे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात अनेकांचा पक्षप्रवेश सुरू आहे. पण जयंत पाटील यांचा भाजप प्रवेश सध्या तरी झालेला नाही.”
अण्णासाहेब डांगे यांनी यापूर्वी जनसंघ, जनता पक्ष, भाजप आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय भूमिका बजावली होती. आता पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केल्याने सांगलीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सांगली भागात मोठा धक्का बसला असून, आगामी स्थानिक निवडणुकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तथापि, जयंत पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे नकार दिल्यामुळे सध्या तरी राजकीय चर्चांना विश्रांती मिळाली आहे.