आयपीएल मेगा लिलाव: अर्जुन तेंडुलकर पुन्हा मुंबई इंडियन्सच्या संघात

आयपीएलच्या मेगा लिलावात पहिल्या फेरीत अनेक खेळाडू अनसोल्ड राहिले. त्यामध्ये अनुभवी अजिंक्य रहाणे आणि युवा खेळाडू अर्जुन तेंडुलकर यांचा समावेश होता. अजिंक्य रहाणेने आपल्या बेस प्राईस 1.50 कोटी रुपये ठेवली होती, ज्यामुळे त्याला संघ मिळेल की नाही यावर चर्चा सुरू होती. मात्र, कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यासाठी बोली लावून त्याला संघात सामील करून घेतले.

दुसरीकडे, अर्जुन तेंडुलकरसाठी सुरुवातीच्या फेरीत कोणत्याही संघाने रस दाखवला नाही. मात्र, पुनरावलोकन यादीत त्याचे नाव पुन्हा आल्यावर मुंबई इंडियन्सने 30 लाखांच्या बेस प्राईससह त्याला संघात घेतले. अर्जुन तेंडुलकर आयपीएलच्या सुरुवातीपासून मुंबई इंडियन्ससोबत आहे. पण त्याने मिळालेल्या संधींचा पुरेपूर फायदा घेतलेला नाही.



अर्जुन हा अनकॅप्ड खेळाडू असून सध्या रणजी ट्रॉफीत गोव्याकडून खेळतो. आयपीएलमध्ये त्याला आतापर्यंत पाच सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. फलंदाजीत त्याने एका डावात 13 धावा केल्या असून गोलंदाजीत 73 चेंडूत 114 धावा देत 3 बळी घेतले आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 9.37 आहे. मागील हंगामात लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळताना दुखापतीमुळे त्याला अर्धवट सामन्यातून माघार घ्यावी लागली होती.

मुंबई इंडियन्सने यंदाही अर्जुनवर विश्वास दाखवत त्याला संघात स्थान दिले आहे. संघाची प्रमुख जबाबदारी कर्णधार हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह यांसारख्या अनुभवी खेळाडूंवर असेल. अर्जुन तेंडुलकरला यंदाच्या हंगामात आपली क्षमता सिद्ध करण्याची मोठी संधी असेल.


मुंबई इंडियन्सचा संघ: हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर, अर्जुन तेंडुलकर, विल जॅक्स, मिचेल सँटनर, आणि इतर युवा खेळाडूंचा समावेश आहे.

या हंगामात अर्जुन तेंडुलकरच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याला मिळालेल्या संधींचा तो कसा उपयोग करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Leave a Comment