इचलकरंजीतील महिलेची ‘टास्क अ‍ॅप’ फसवणूक प्रकरण: आठ लाखांचा ऑनलाईन गंडा

इचलकरंजी (जि. कोल्हापूर) – ऑनलाईन ‘टास्क अ‍ॅप’च्या माध्यमातून एका महिलेची तब्बल आठ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. झटपट पैसे कमविण्याच्या आमिषाला बळी पडून ही महिला सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकली. या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, 32 वर्षीय महिला टेलिग्राम अ‍ॅपवर फातिमा नावाच्या खातेदाराशी संपर्कात आली होती. तिने महिलेला एक लिंक पाठवून ‘टास्क’ पूर्ण केल्यास पैसे मिळतील, असे सांगितले. सुरुवातीला काही टास्क पूर्ण केल्यानंतर महिलेला 140 रुपये मिळाले. पुढे फसवणुकीचा मुख्य सापळा सुरू झाला.

महिलेने लिंकवर क्लिक केल्यानंतर एका चार्टद्वारे महागड्या वस्तूंवर गुंतवणूक करून त्यावर कमिशन मिळविण्याचे सांगण्यात आले. एका टास्कसाठी पैसे भरल्यानंतर दुसरे टास्क उघडत गेले. टास्क पूर्ण करण्यासाठी महिला वारंवार पैसे भरत गेली, आणि तिच्याकडून एकूण ₹8,00,000 उकळण्यात आले.

यावेळी महिला सतत गुंतवणूक करत राहिली कारण प्रत्येक वेळी “शेवटचं टास्क” सांगून अधिक पैसे मिळवण्याचे आमिष दिले जात होते. मात्र शेवटी ना टास्क पूर्ण झाले, ना पैसे परत मिळाले.

तक्रारदार महिलेने सांगितले की, 11 जुलै रोजी तिने ₹70,000 भरल्यानंतर टास्क उघडलेच नाही. यानंतर तिने स्कॅमचा संशय घेत पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून फातिमा व अज्ञात व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर क्राइमपासून सावधगिरी आवश्यक:
या प्रकारामुळे ऑनलाईन पैसे कमविण्याच्या नावे सुरु असलेल्या स्कॅम्सकडे सामान्य नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचे आणि बिनधास्त माहिती शेअर न करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment