नवी दिल्ली : सामान्यांना मोठा दिलासा देणारी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. येत्या दिवाळीपूर्वी वस्तू व सेवा कर (GST) रचनेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करून कराचा भार हलका करण्यात येणार आहे. लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्राला संबोधित करताना मोदी यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.
सध्या जीएसटीचे चार वेगवेगळे करस्तर आहेत – ५%, १२%, १८% आणि २८%. मात्र केंद्र सरकार आता ही रचना सोपी करत दोनच करस्तर ठेवण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच दैनंदिन वापराच्या बहुतेक वस्तू ५% करस्तरात येणार असून इतर वस्तू व सेवांवर १८% कर लागू राहणार आहे. चैनीच्या वस्तूंवरील करातही मोठी घट होणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या माहितीनुसार, जीएसटी परिषदेच्या मंत्रिगटाला (GoM) करसुलभीकरणाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार करभरणा प्रक्रिया सोपी करण्याबरोबरच, १२% करस्तरातील सुमारे ९९% वस्तू आता थेट ५% मध्ये समाविष्ट केल्या जाणार आहेत.
काय होणार स्वस्त?
- चीज, तूप, बटर, फळांचे पॅकबंद रस, लोणचे, मुरांबा, चटणी, जॅम, पॅकबंद नारळपाणी यांवर १२% ऐवजी ५% कर लागू होईल.
- छत्री आणि शिवणयंत्र यांसारख्या वस्तूंनाही स्वस्त दर मिळेल.
- सध्या २८% जीएसटी लागू असलेले एसी, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन आणि सिमेंट आता १८% करस्तरात येणार आहेत.
बदलानंतरचे करस्तर
- अत्यावश्यक वस्तू, औषधे आणि शिक्षण सेवांवर पूर्वीप्रमाणे शून्य कर
- दैनंदिन वापराच्या बहुतेक वस्तूंवर ५% कर
- विमा वगळता इतर सर्व सेवांवर १८% कर
मोदी सरकारच्या या निर्णयामुळे थेट ग्राहकांच्या खिशाला दिलासा मिळणार असून दिवाळीपूर्वी मोठी गिफ्ट ठरणार आहे. महागाईच्या तडाख्यातून सुटका मिळावी यासाठी ग्राहकवर्गानेही या निर्णयाचे स्वागत केले आहे.