मुंबई : बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांचं नातं गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होतं. सोशल मीडियावर दोघांच्या घटस्फोटाच्या अफवा जोरात पसरत होत्या. सुनीताने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला असल्याचीही चर्चा होती. मात्र, गणेश चतुर्थी 2025 निमित्त या जोडप्याने एकत्र येत सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.
गोविंदा आणि सुनीता यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानी गणरायाचे जल्लोषात स्वागत केले. गणपती बाप्पाचे आगमन करताना हे दाम्पत्य एकत्र दिसले आणि आनंदी मुद्रेतील त्यांचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या खास प्रसंगी सुनीताने मरुन रंगाची सिल्क साडी आणि सुंदर पारंपरिक दागिने परिधान केले होते, तर गोविंदानेही त्याच रंगाचा कुर्ता घालून मॅचिंग लुक घेतला. दोघांनी एकत्रित पापाराझींना मिठाई वाटली आणि गणपती बाप्पाच्या स्वागताचा आनंद वाटून घेतला.
गोविंदा-सुनीता यांच्या या एकत्रित दर्शनामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. चाहत्यांनीही या जोडप्याच्या एकत्रित क्षणांवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, गोविंदा आणि सुनीता हे बॉलिवूडमधील सर्वात चर्चित जोडप्यांपैकी एक मानले जाते. वैयक्तिक आयुष्यातील वाद असो वा आनंदाचे क्षण – या दोघांचे नाव सतत चर्चेत राहते. पण यंदाच्या गणेशोत्सवात त्यांनी एकत्र येत कौटुंबिक बंध दृढ असल्याचे दाखवून दिले आहे.