मुंबईच्या बोरिवलीतील उदयोन्मुख बॅडमिंटनपटू गाथा सुर्यवंशी हिने राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळातून दुहेरी यश मिळवत सर्वांचे लक्ष वेधले. पीवायसी हिंदू जिमखाना आणि डेक्कन जिमखाना येथे पार पडलेल्या या स्पर्धेत गाथाने मुलींच्या 17 वर्षांखालील गटात एकेरी व दुहेरी दोन्ही प्रकारांमध्ये विजेतेपद पटकावले.
एकेरीत, दुसरी मानांकित गाथाने पुण्याच्या अव्वल मानांकित शरयू रांजणेचा 21-15, 21-15 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तिच्या निर्णायक खेळीने सर्व उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. गाथा सध्या हैदराबाद येथील गोपीचंद बॅडमिंटन अकादमीत भारताचे माजी स्टार खेळाडू पुलेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.
दुहेरीत, गाथा आणि पालघरच्या प्रांजल शिंदे ह्या जोडीनेही आपली पकड सिद्ध केली. कोल्हापूरच्या दक्षयानी पाटील आणि नागपूरच्या शौर्य मडावी या अव्वल मानांकित जोडीविरुद्धच्या लढतीत गाथा-प्रांजल जोडीने 18-11 अशा आघाडीवर असताना प्रतिस्पर्धी खेळ सोडल्याने त्यांना सहज विजेते घोषित करण्यात आले.
मुलांच्या एकेरी गटात पुण्याचा दुसरी मानांकित सचेत त्रिपाठी याने नागपूरच्या अव्वल मानांकित ऋत्व सजवानवर 21-7, 18-21, 21-19 अशा तीन गेम्सच्या झुंजार लढतीत विजय मिळवला. हा सामना दोघांमधील चुरशीच्या झुंजीमुळे विशेष लक्षवेधी ठरला.
दुहेरीत, पुण्याच्या अवधूत कदम आणि ओजस जोशी ह्या जोडीने दमदार खेळ करत सयाजी शेलार (पुणे) आणि उदयन देशमुख (संभाजीनगर) यांचा 21-9, 21-15 असा सहज पराभव केला.
मिश्र दुहेरी प्रकारात, नागपूरच्या ऋत्व सजवान आणि शौर्य मडावी यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली. त्यांनी पुण्याच्या ओजस जोशी आणि ठाण्याच्या तन्वी घारपुरे या दुसऱ्या मानांकित जोडीला 21-16, 18-21, 21-18 अशा गुणसंख्येने पराभूत करत विजेतेपद मिळवले.
ही स्पर्धा राज्यातील तरुण बॅडमिंटन खेळाडूंना आपली कौशल्ये सिद्ध करण्याची मोठी संधी देणारी ठरली. गाथा सुर्यवंशीसारख्या खेळाडूंचा झंझावात पाहता, महाराष्ट्र बॅडमिंटनचे भविष्य उज्ज्वल आहे, हे नक्की.