गणेशोत्सवाचे दहा दिवस संपल्यानंतर गणपती बाप्पाला निरोप देण्याचा क्षण हा प्रत्येक भाविकासाठी भावनिक असतो. दहा दिवसांची अखंड पूजा, आरती, भजन-कीर्तन, आणि प्रसाद यानंतर अनंत चतुर्दशीला बाप्पाचे विसर्जन केले जाते. विसर्जनापूर्वी “उत्तरपूजा” करण्याची परंपरा आहे. चला तर जाणून घेऊया Ganpati Visarjan 2025 मध्ये उत्तरपूजा कशी करावी, शुभ मुहूर्त कोणते आहेत आणि बाप्पाला निरोप देण्याची योग्य पद्धत कोणती आहे.
गणेश विसर्जन 2025 शुभ मुहूर्त
📅 ६ सप्टेंबर २०२५ (शनिवार)
- शुभ मुहूर्त: सकाळी 07:36 ते 09:10
- चर, लाभ आणि अमृत मुहूर्त: दुपारी 12:19 ते संध्याकाळी 05:02
- लाभ मुहूर्त: संध्याकाळी 06:37 ते रात्री 08:02
- शुभ, अमृत, चर मुहूर्त: रात्री 09:28 ते पहाटे 01:45
📅 ७ सप्टेंबर २०२५ (रविवार)
- लाभ मुहूर्त: पहाटे 04:36 ते संध्याकाळी 06:02
(भाविक आपल्या सोयीप्रमाणे आणि उपलब्ध वेळेनुसार या पैकी कोणत्याही शुभ मुहूर्तावर विसर्जन करू शकतात.)
उत्तरपूजा कशी करावी?
- स्वच्छ स्नान करून पूजा स्थळी बसावे.
- कपाळाला गंध-कुंकू लावून संकल्प करावा.
- पंचोपचार पूजन करावे –
- गंध अर्पण (चंदन)
- फुले अर्पण
- धूप (उदबत्ती)
- दीप (आरती/नीरांजन)
- नैवेद्य अर्पण
- श्रीफळ, विडा आणि दक्षिणा अर्पण करून गणपती बाप्पाकडे संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी.
- “यांतु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवीम्…” हा मंत्र उच्चारून मूर्तीवर अक्षता ठेवाव्या.
- त्यानंतर आरती करून गणपती बाप्पाला वंदन करावे.
- मूर्ती थोडीशी सरकवून “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा जयघोषात विसर्जनासाठी घेऊन जावे.
विसर्जनाची योग्य पद्धत
- मूर्ती पाण्यात फेकू नये. ती आदरपूर्वक व सुरक्षितपणे प्रवाहित करावी.
- पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य द्यावे.
- सामूहिक विसर्जन तलाव, कृत्रिम जलतलाव किंवा नगरपालिकेने नेमलेल्या ठिकाणीच करावे.
विशेष टिप
गणेश विसर्जन हा केवळ धार्मिक विधी नाही, तर कुटुंब व समाजाला एकत्र आणणारा उत्सवाचा परमोच्च क्षण आहे. त्यामुळे उत्सवाचा शेवट आनंद, शिस्त आणि पर्यावरणपूरक मार्गाने करणे हे प्रत्येक भक्ताचे कर्तव्य आहे.
🪔 गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!