मुंबई
फेसबुकवर एक कोडी सोडविण्याचा खेळ ७९ वर्षीय वृद्धेसाठी महागात पडला आहे. एक कोटी रुपयांचे बक्षीस लागल्याच्या आमिषाने भामट्यांनी तब्बल २१ लाख रुपये उकळले असून, याप्रकरणी उत्तर सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरेगावच्या मूळ रहिवासी असलेल्या या वृद्ध महिला सध्या चारकोप, कांदिवली येथे वास्तव्याला आहेत. त्यांच्या इमारतीचा पुनर्विकास सुरू असल्याने त्या तात्पुरत्या राहण्यासाठी इथे स्थलांतरित झाल्या आहेत. त्या फेसबुक या समाजमाध्यमावर नियमित सक्रीय होत्या. एप्रिल २०२५ मध्ये फेसबुक पाहत असताना त्यांना “गेम पेज” समोर आले आणि त्यांनी सहजपणे त्यावर दिलेल्या कोड्यांची उत्तरे दिली. त्यांची उत्तरे अचूक निघाल्यानंतर काही दिवसांतच त्यांना ‘हॅज फंड मॅनेजर’ या नावाने एक फोन आला.
फोन करणाऱ्याने सांगितले की, “तुम्ही दिलेली उत्तरे सर्व अचूक आहेत. तुम्हाला १०० मिलियन म्हणजेच १ कोटी रुपयांचे बक्षीस लागले आहे.” विश्वास बसावा म्हणून त्या व्यक्तीने एक लिंकही पाठवली, जिच्यावर क्लिक करून “बक्षिसासाठी प्रक्रिया सुरू करावी” असे सांगितले गेले.
त्यानंतर हळूहळू ‘प्रोसेसिंग फी’, ‘GST’, ‘बँक क्लिअरन्स’, ‘कस्टम चार्ज’, ‘फॉरेन एक्स्चेंज ट्रान्सफर फी’ अशा विविध कारणांनी त्या वृद्धेने एकूण २१ लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले.
परंतु बक्षीसाची रक्कम काही मिळाली नाही आणि संबंधित लोकांचे संपर्क क्रमांकही बंद झाले. त्यानंतर वृद्धेला फसवणुकीची जाणीव झाली आणि त्यांनी उत्तर सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सायबर पोलिसांकडून तपास सुरू असून, कॉल, लिंक, आणि बँक खात्यांचे तपशील गोळा केले जात आहेत. प्राथमिक तपासात हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सावधगिरीचे आवाहन:
सामाजिक माध्यमांवर कोणतीही आर्थिक गोष्ट खात्रीशीर न ठरल्यास तिचा पाठपुरावा करू नका. कोणतीही माहिती किंवा पैसे देण्यापूर्वी संबंधित कंपनी, संस्था किंवा बक्षिसाबद्दलची माहिती खात्री करून घ्या. सायबर फसवणूक टाळण्यासाठी १८००-२६६-०००० या हेल्पलाईनवर सल्ला घ्या.