दुलीप करंडक 2025 : शुभमन गिलकडे उत्तर विभागाचे नेतृत्व, अर्शदीप सिंग व हर्षित राणाचाही संघात समावेश


नवी दिल्ली – आगामी दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी उत्तर विभागाचे नेतृत्व भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलकडे सोपविण्यात आले आहे. २८ ऑगस्टपासून सुरू होणारी ही स्पर्धा भारतातील नव्या क्रिकेट हंगामाची अधिकृत सुरुवात ठरणार आहे. उत्तर विभागाचा पहिला सामना २८ ऑगस्ट रोजी पूर्व विभागाविरुद्ध होणार आहे.

दुलीप करंडकाची अंतिम लढत ११ सप्टेंबरपासून खेळवली जाईल. मात्र, त्याच कालावधीत भारतीय संघ आशिया चषक ट्वेन्टी २० स्पर्धेत सहभागी होणार आहे. भारताचा पहिला सामना १० सप्टेंबरला संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध होणार असल्याने, उत्तर विभागातील काही प्रमुख खेळाडूंचा अंतिम सामन्यात सहभाग अनिश्चित आहे.

उत्तर विभागाच्या संघात शुभमन गिलसह वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय अंकित कुमार (उपकर्णधार), शुभम खजुरिया, आयुष बदोनी, यश धूल, अंकित कलसी, निशांत सिंधू, साहिल लोत्रा, मयांक डागर, युधवीर सिंग चरक, अंशुल कम्बोज, अकिब नबी आणि कन्हैया वाधवान हे खेळाडूही संघाचा भाग आहेत.

आशिया चषकासाठी तिघांची भारतीय संघात निवड झाल्यास, त्यांना दुलीप करंडकाच्या अंतिम लढतीला मुकावे लागू शकते. यासाठी शुभम रोहिल्ला, गुरनूर ब्रार आणि अनुज ठकराल यांना राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे.

दुलीप करंडक स्पर्धा ही भारतातील प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. देशातील सर्वोत्तम प्रतिभावान खेळाडूंना आपली कौशल्ये सादर करण्याची ही मोठी संधी असते. यंदाच्या मोसमात शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील उत्तर विभागाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

Leave a Comment