डोंबिवली न्यूज | गणेशोत्सव जवळ आल्याने मूर्तिकारांवर कामाचा प्रचंड ताण असतो. अशातच डोंबिवली पश्चिमेतील प्रसिद्ध मूर्तिकार प्रफुल्ल तांबडे दोन दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाले होते. त्यामुळे शहरभर खळबळ उडाली होती. अखेर ते स्वतःहून विष्णूनगर पोलिस ठाण्यात हजर झाले असून, मूळ कारण उघड झाले आहे.
मारहाणीमुळे आणि ताणामुळे घेतला पळ
प्रफुल्ल तांबडे यांच्याकडे गणेशोत्सवासाठी अपेक्षेपेक्षा जास्त मूर्तींच्या ऑर्डर्स होत्या. वेळेत मूर्ती तयार न झाल्याने काही गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर दबाव टाकला. एवढंच नव्हे तर त्यांना मारहाणही करण्यात आली. त्यामुळे घाबरून त्यांनी साताऱ्याला जाऊन लपण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिस चौकशीत समोर आले.
मंडळांकडून संताप, पोलिसांत तक्रार
मूर्ती वेळेत न मिळाल्याने अनेक मंडळांनी संताप व्यक्त केला. याच कारणामुळे कलाकेंद्रासमोर मोठी गर्दी झाली आणि विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिस प्रफुल्लचा शोध घेत असतानाच ते स्वतः आई-वडिलांसोबत हजर झाले.
पोलिसांची चौकशी व निर्णय
पोलिसांनी चौकशी केली असता, मारहाणीच्या भीतीमुळेच आपण पळून गेलो असल्याचे प्रफुल्ल यांनी सांगितले. त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षेचा असल्याने, आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्यांना सोडण्यात आले.
ग्राहकांना परतफेडीचे आश्वासन
या प्रकरणात प्रफुल्ल यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना आश्वासन दिले आहे की, ज्या ग्राहकांनी मूर्तींसाठी पैसे दिले आहेत त्यांना पावत्या तपासून संपूर्ण परतफेड केली जाईल. त्यामुळे आता हे प्रकरण शांत होण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, या प्रकारामुळे डोंबिवलीतील अनेक मंडळांची चिंता वाढली होती. मात्र आता मूर्तिकार हजर झाल्याने परिस्थिती हळूहळू सुरळीत होत आहे.