‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपट पाहताना मुलीला झाल्या भावना अनावर, आम्हाला माफ करा महाराज

‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज – भाग 1’ हा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळवत आहे. सिनेमा रिलीज होताच सोशल मीडियावर प्रेक्षकांचे रिव्ह्यू आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. विशेषतः एका तरुणीचा भावनिक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे.



सिनेमाचा शेवट पाहून भावूक झालेली ही तरुणी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. शेवटच्या सीननंतर मोठमोठ्याने रडत, “आम्हाला माफ करा महाराज” असे म्हणणाऱ्या या तरुणीचा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे.

चित्रपटाचा शेवटचा सीन विशेष गाजत असून, छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या जुलमी सत्तेला विरोध करत दिलेल्या लढ्याचा थरार प्रेक्षकांना अंतर्मुख करत आहे. महाराजांच्या बलिदानाने हिंदुत्वाच्या महत्त्वाला अधोरेखित करणारा हा सीन प्रेक्षकांच्या हृदयात घर करत आहे.



संदीप रघुनाथ मोहिते-पाटील प्रस्तुत, उर्विता प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर मोहिते-पाटील यांनी केले आहे. या चित्रपटात ठाकुर अनुप सिंग, अमृता खानविलकर, किशोरी शहाणे, भार्गवी चिरमुले, आणि मल्हार मोहिते-पाटील यांच्या ताकदीच्या अभिनयाने चित्रपटाला एक वेगळा स्तर मिळाला आहे.

महाराष्ट्रभर प्रेक्षकांचा चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत असून, मराठी मनाला अभिमान वाटावा असा हा सिनेमा इतिहासाचा गौरवशाली ठसा उमटवतोय.

Leave a Comment