नवी दिल्ली – चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी सोमवारी भारताच्या दौऱ्यावर येणार असून, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांच्यासोबत ‘विशेष प्रतिनिधी’ स्तरावरील महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहेत. भारत-चीन सीमावादासह अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर या बैठकीत सखोल संवाद अपेक्षित आहे.
रशियातील कझान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या भेटीनंतर ‘विशेष प्रतिनिधी स्तरावर’ संवाद सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर, गतवर्षी डिसेंबर महिन्यात अजित डोभाल यांनी चीनमध्ये जाऊन वँग यी यांच्यासोबत बैठक घेतली होती. आता या चर्चेचा पुढील टप्पा सोमवारी नवी दिल्लीमध्ये होणार आहे.
वँग यी यांचा हा दौरा प्रामुख्याने सीमावाद विषयक चर्चेसाठी असला तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी चीन दौऱ्याबाबतही महत्त्वपूर्ण संवाद होण्याची शक्यता आहे. महिन्याच्या अखेरीस चीनमधील तिआनजिन शहरात होणाऱ्या ‘शांघाय सहकार संघटना’च्या (SCO) वार्षिक परिषदेला पंतप्रधान मोदी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या परिषदेत मोदी-जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.
मोदी यांच्या चीन दौऱ्याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, सध्याच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक स्तरावर आयात शुल्क वाढविण्याचे धोरण अवलंबल्यामुळे, भारत-चीन संबंधातील संवादाला धोरणात्मक महत्त्व प्राप्त झाले आहे.
या भेटीद्वारे दोन्ही देशांमध्ये सीमावाद सोडविण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होईल, तसेच आर्थिक आणि व्यापार क्षेत्रातील सहकार्य वाढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे.