बिल गेट्सची हायड्रोजनवर चालणारी ‘Breakthrough’ सुपरयॉट विक्रीसाठी; किंमत किती कोटी?


मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि प्रसिद्ध अब्जाधीश बिल गेट्स यांची नावावर असलेली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सजलेली लक्झरी यॉट ‘Breakthrough’ आता विक्रीसाठी सज्ज झाली आहे. तब्बल $645 दशलक्ष म्हणजेच जवळपास 5400 कोटी रुपये किंमत असलेली ही भव्य नौका पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा अत्युच्च नमुना मानली जात आहे.

ही यॉट पूर्वी Project 821 या नावाने ओळखली जात होती. नेदरलँड्समधील Feadship कंपनीने जवळपास पाच वर्षे मेहनत घेऊन ही यॉट तयार केली असून, RWD डिझाईन स्टुडिओ ने याचं आकर्षक आणि भविष्योन्मुख डिझाईन केलं आहे. विशेष बाब म्हणजे, ही जगातील पहिली नेट-झीरो सुपरयॉट आहे, जी पूर्णतः लिक्विड हायड्रोजनवर चालते.

यामध्ये वापरलेलं फ्युएल-सेल तंत्रज्ञान स्वच्छ वीज निर्माण करतं आणि तयार होणारी अतिरिक्त उष्णता टॉवेल वॉर्मर्स, स्टीम रूम्स, बाथरूम फ्लोअरिंग व स्विमिंग पूलमध्ये वापरली जाते. हायड्रोजन उपलब्ध नसल्यास बायोफ्युएल बॅकअप सिस्टम वापरली जाते, ज्यामुळे 90% पर्यंत कार्बन उत्सर्जनात घट साधली जाते.

390-फुट लांबीच्या या भव्य नौकेत सात डेक्स, फुल-साईज बास्केटबॉल कोर्ट, सिनेमा थिएटर, हॉट टब्स, खाजगी हॉस्पिटल, आणि चार मजली टाउनहाऊससारखी अंतर्गत रचना आहे. यामध्ये ऑफिसेस, ग्रंथालये, फायरप्लेस आणि समुद्राकडे देखणं दृश्य देणाऱ्या टेरेसेसही आहेत.

15 गेस्ट कॅबिन्समध्ये 30 पाहुण्यांसाठी आणि 43 क्रू मेंबर्ससाठी विशेष जागा आहे. यॉटमध्ये लेदर, मार्बल, ओक आणि रॅटन यांसारख्या उच्च दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात आला आहे.

तथापि, या यॉटबाबत एक गूढ बाब अशी आहे की बिल गेट्स यांनी अद्याप यॉटवर पाऊलही ठेवलेलं नाही. त्यांनी स्वतः कधीही या यॉटचं मालकत्व मान्य केलं नाही, पण अनेक सूत्रांनी या यॉटचं डिझाईन आणि निर्मिती गेट्स यांच्या सूचनेनुसार करण्यात आल्याचा दावा केला आहे.

ही यॉट येत्या 24 ते 27 सप्टेंबर 2025 दरम्यान मोनाको यॉट शोमध्ये जगासमोर सादर केली जाणार आहे. Boat International नुसार, ही यॉट त्या शोमधील सर्वात मोठी नौका असणार आहे.

दरम्यान, Green For Life Environmental चे सीईओ आणि कॅनेडियन अब्जाधीश पॅट्रिक डोविगी ही यॉट विकत घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

Edmiston ब्रोकरेज कंपनीमार्फत ही यॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे. कंपनीचे सीईओ जेमी एडमिस्टन म्हणाले, “ही यॉट उद्योगातील सगळं काही बदलून टाकणार आहे. ही यॉट भविष्यातील एक पर्यावरणस्नेही, अत्याधुनिक आणि क्रांतिकारी उदाहरण ठरणार आहे.”

Leave a Comment