देशाच्या प्रगतीसाठी विकास आणि पर्यावरण रक्षणाचा समतोल राखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. त्यांनी पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली दुराग्रही भूमिका घेणे टाळण्याचा सल्ला दिला.
‘पर्यावरणासाठी जीवनशैली : शाश्वत विकासासाठी भारतीय दृष्टिकोन’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन गोवर्धन इको व्हिलेज, कोटक स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, आणि एनआयटी वारंगल यांच्या सहकार्याने नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या सभागृहात करण्यात आले होते.
राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले की, भारतीय संस्कृतीत निसर्गपूजेचा महत्त्वाचा वारसा आहे. नद्यांचे, पर्वतराजींचे व वृक्षांचे पूजन हे केवळ परंपरागत नव्हे तर निसर्गाच्या महत्त्वाचे स्मरण करून देणारे आहे. “आपण पृथ्वीचे मालक नसून विश्वस्त आहोत,” असे त्यांनी नमूद केले.
त्यांनी पाणी व्यवस्थापन, नदीजोड प्रकल्प आणि स्वच्छ ऊर्जानिर्मिती यांसारख्या शाश्वत विकासासाठीच्या उपाययोजनांचा उल्लेख केला. त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी ताठर भूमिका न घेता सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याचे महत्त्व सांगितले. उदाहरणादाखल त्यांनी दक्षिण भारतातील महामार्ग प्रकल्पाचा उल्लेख केला, जिथे चार झाडांच्या रक्षणासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. “जर झाडे तोडणे अपरिहार्य असेल, तर त्याऐवजी २५ नवी झाडे लावण्याचा निर्णय घ्यायला हवा,” असे ते म्हणाले.
गोवर्धन इको व्हिलेजचे संचालक गौरांग दास यांनी भारतीय विचारधारेतील जबाबदार पाणी, अन्नधान्य आणि ऊर्जा वापराबद्दलचे विचार मांडले. त्यांनी प्लास्टिक आणि ई-कचऱ्याच्या वाढत्या संकटावरही चिंता व्यक्त केली.
या उद्घाटन सत्राला ‘रिव्हर मॅन ऑफ इंडिया’ रमण कांत, भारतीय नदी परिषदेचे सदस्य तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
- केंद्रीय अर्थसंकल्प 2025: 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, नवीन कर प्रणालीत मोठी सवलत
- अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला: वादग्रस्त घटनांमुळे सुपरस्टारने घेतला मोठा निर्णय
- जैसलमेरमध्ये जीएसटी परिषदेची बैठक; दरांमध्ये महत्त्वाचे बदल, महागाईचा भार वाढला
- तुम्ही पाहायलाच हवेत: 2024 चे 10 दमदार हिंदी सिनेमे
- मुंबई आणि टीम इंडियाला अलविदा, पृथ्वी शॉ या देशासाठी खेळणार विश्वचषक!