सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा उपक्रम लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे, अशी घोषणा राज्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत केली. युवा संदेश प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘सिंधुरत्न टॅलेंट सर्च (STS)’ परीक्षेच्या बक्षीस वितरण सोहळ्याच्या निमित्ताने ते बोलत होते.
नितेश राणे म्हणाले, “जगातल्या प्रगत देशांमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण दिलं जातं. त्याच धर्तीवर सिंधुदुर्गात एआयच्या मदतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा मानस आहे. एआय प्रणालीचा वापर करणारा सिंधुदुर्ग हा देशातील पहिला जिल्हा ठरणार आहे. यासाठी माझ्या प्रयत्नांना गती मिळत आहे.”
युवा संदेश प्रतिष्ठानच्या सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांचं कौतुक करत त्यांनी सांगितलं की, “ही संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. ‘सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा’मुळे जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेची भावना वाढीस लागते. या परीक्षेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक पायाभरणीत भरीव योगदान दिलं जात आहे.”
या सोहळ्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, युवा संदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेश सावंत, अध्यक्षा संजना सावंत, माजी पंचायत समिती सदस्य व विविध राजकीय-सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सीईओ रवींद्र खेबुडकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व समजावले. त्यांनी सांगितले की, “दहावी-बारावीच्या परीक्षा सब्जेक्टिव्ह असतात, मात्र स्पर्धा परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाच्या असतात. जीवनात दोन्ही दृष्टिकोन आवश्यक आहेत – करिअरमध्ये ऑब्जेक्टिव्ह तर कौटुंबिक आयुष्यात सब्जेक्टिव्ह.”
युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक संदेश सावंत यांनी सांगितले की, “पूर्व मुख्यमंत्री नारायण राणे यांचं ८०% समाजकारण आणि २०% राजकारण याच तत्वावर आम्ही कार्य करत आहोत. संस्थेच्या माध्यमातून ३६५ पैकी १०० दिवस उपक्रम राबवले जातात, आणि आता ‘सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा’ सिंधुदुर्गासोबत रत्नागिरी व पालघर या जिल्ह्यांमध्येही राबवली जात आहे.”
सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. यामध्ये बाबुराव कोरगावकर व दिव्या बाणे यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
शेवटी नितेश राणे यांनी सांगितले, “विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर अत्यावश्यक आहे. एआय तंत्रज्ञानावर आधारित नवे शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू.”