कोल्हापुरी मिसळ म्हणजे महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतील एक झणझणीत आणि लोकप्रिय डिश. मटकीची उसळ, मसालेदार कट, फरसाण, कांदा, लिंबू आणि ब्रेड यांचा परिपूर्ण संगम म्हणजे मिसळ. खास करून कोल्हापुरी मिसळ तिच्या तिखट चवीसाठी आणि सुगंधी मसाल्यांसाठी प्रसिद्ध आहे. चला तर जाणून घेऊया ही झणझणीत मिसळ घरच्या घरी कशी करायची.
लागणारे जिन्नस
- ३ वाट्या मोड आलेली मटकी
- २ बटाटे (चिरून)
- ४ मोठे कांदे
- २ वाट्या ओले खोबरे
- १ वाटी सुके खोबरे
- २ लसूण गड्डे (सोलून)
- ३ इंच आले
- १ जुडी कोथिंबीर
- २ मोठे चमचे कोल्हापुरी कांदा-लसूण चटणी
- १ चमचा धणे, १ चमचा जिरे
- ५-६ लवंगा, १ दालचिनीचा तुकडा, ५-६ काळी मिरी
- मीठ, तेल, हिंग, हळद, तिखट
- फरसाण किंवा हॉट मिक्स, ब्रेड, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लिंबू
उसळ बनवण्याची कृती
१. एका पातेल्यात तेल तापवून त्यात हिंग, हळद घाला.
२. मटकी आणि बटाटे टाकून परता.
३. त्यात तिखट, मीठ आणि बुडेल इतके पाणी घालून शिजवून घ्या. (मटकी फार मऊ होऊ नये).
कटाची तयारी
१. उरलेला कांदा, ओले व सुके खोबरे, गरम मसाला भाजून बारीक वाटून घ्या.
2. आले, लसूण, कोथिंबीर वेगळे वाटून घ्या.
3. एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करून त्यात हिंग, हळद, उभा चिरलेला कांदा आणि कोल्हापुरी चटणी घालून परता.
4. त्यात दोन्ही वाटणं घालून छान परता.
5. मग मीठ आणि ४ कप पाणी घालून उकळी येऊ द्या.
मिसळ कशी वाढावी?
- एका खोलगट ताटात फरसाण घ्या.
- त्यावर मटकी उसळ, थोडा कच्चा कांदा आणि कोथिंबीर टाका.
- वरून कट घाला.
- चवीनुसार लिंबू पिळा.
- गरमागरम ब्रेड किंवा पावसोबत सर्व्ह करा.
खास टिप्स
- कोल्हापुरी मिसळ झणझणीत असते. जर तिखट कमी करायचे असेल तर दही, टोमॅटो किंवा शेव घालून चव मवाळ करू शकता.
- बाजारात मिळणारे ‘भोसले यांचे मराठा दरबार मसाले’ वापरल्यास कटाची तयारी सोपी होते आणि चव अप्रतिम लागते.
ही झणझणीत आणि चविष्ट कोल्हापुरी मिसळ घरच्या घरी नक्की करून पाहा आणि महाराष्ट्राच्या अस्सल चवीचा आनंद घ्या.