ठरलं तर मग मालिकेत पूर्णाआजीच्या भूमिकेसाठी कोणाची एन्ट्री? जुई गडकरीने दिला अपडेट


मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने मराठी मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 78व्या वर्षीही त्या अभिनय क्षेत्रात सक्रीय होत्या. स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग मध्ये त्यांनी साकारलेली पूर्णाआजी ही भूमिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत ठरली होती. मात्र, त्यांच्या अचानक जाण्यामुळे मालिकेत पुढे कोण पूर्णाईची भूमिका साकारणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

सध्या मालिका महत्त्वाच्या टप्प्यावर आली असून कथानक पुढे नेण्यासाठी पूर्णाईची भूमिका खूपच गरजेची आहे. त्यामुळेच चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे की, “पूर्णाआजीच्या भूमिकेत पुढे कोण दिसणार?”

या संदर्भात अभिनेत्री जुई गडकरी हिनं तिच्या चाहत्यांसोबत घेतलेल्या आस्क मी एनीथिंग सेशनमध्ये भाष्य केलं. तिला चाहत्यांनी थेट विचारलं – “पूर्णाआजीच्या रोलसाठी कोणाची एन्ट्री होणार आणि कधी?”

यावर उत्तर देताना जुई म्हणाली,
“आम्हाला देखील या बद्दल अजून काही कळलेलं नाही. ही भूमिका कोण साकारणार, किंवा कधी नवीन एंट्री होणार हे सर्व निर्णय चॅनेलकडून घेतले जातात. त्यामुळे अधिकृत घोषणा होईपर्यंत युट्यूब, इन्स्टा किंवा फेसबुकवर फिरणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. आम्ही सगळेच ज्योतीताईंची खूप आठवण काढत आहोत.”

जुई गडकरी आणि ज्योती चांदेकर यांचे खूप जिव्हाळ्याचे नाते होते. जुईने सोशल मीडियावर अनेक वेळा त्यांच्यासोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत. अगदी आजी-नातीसारखं त्यांचं नातं प्रेक्षकांनाही जाणवत असे. जुईनं सेशनदरम्यान हेही सांगितलं की, “मी एकदा त्यांच्यासाठी अळूचं फदफद बनवलं होतं आणि त्यांना ते खूप आवडलं होतं.”

आता पुढील काही दिवसांत चॅनेलकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत ठरलं तर मग मालिकेचे चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत की, पूर्णाआजीच्या भूमिकेत नक्की कोणाची एन्ट्री होणार?

Leave a Comment