मुंबईत मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू: मनोज जरांगे यांच्या उपोषणावर शरद पवारांच्या भेटीची चर्चा

मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून मुंबई आता मराठा आंदोलनाचे केंद्र ठरत आहे. अंतरवाली सराटी आणि वाशी येथील दमदार आंदोलनानंतर आता मराठा समाजाने ठाम भूमिका घेतली आहे – “ओबीसीतून आरक्षणाशिवाय माघार नाही.”

मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सततच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली असून शुक्रवारी रात्री त्यांना त्रास जाणवला. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी रात्री उपोषणस्थळी भेट देऊन जरांगे यांच्याशी चर्चा केली. या भेटीत टोपे यांनी शरद पवारांचा निरोप पोहोचवल्याची चर्चा रंगली आहे.

आता ज्येष्ठ नेते शरद पवार स्वतः मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रथम ते उरळी कांचन येथे जाणार असून त्यानंतर मुंबईत येऊन जरांगे यांची भेट घेऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत. ही भेट घडली तर सरकारवर मोठा राजकीय दबाव येण्याची शक्यता आहे. कारण अद्याप राज्य सरकारमधील कोणत्याही मंत्र्याने जरांगे यांना प्रत्यक्ष भेट दिलेली नाही.

दरम्यान, न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने जरांगे यांची भेट घेतली असली तरी भाजपच्या गोटातून मात्र त्यांच्या आंदोलनावर हल्लाबोल सुरू आहे. याउलट पवार यांच्या संभाव्य भेटीमुळे जनमत सरकारविरोधात वळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.

सरकारला दिलेल्या वेळोवेळीच्या मुदतीनंतरही ठोस निर्णय न झाल्यामुळे मराठा समाजात असंतोष वाढला आहे. कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू असले तरी पडताळणी न झाल्याने त्याला कायदेशीर बळ मिळालेलं नाही. त्यामुळे मराठा समाज पुन्हा पेटला असून, आगामी दिवसांत आंदोलनाला अधिक तीव्र वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment