मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाने संपूर्ण कलाविश्व शोकाकुल झाले आहे. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी तिने कर्करोगाशी झुंज देत अखेरचा श्वास घेतला. तिच्या अचानक जाण्याने पती आणि अभिनेता शंतनू मोघे यांच्यासह मराठी प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे.
प्रिया मराठे आणि शंतनू मोघे यांची प्रेमकथा सिनेमासारखीच गोड आणि हटके होती. दोघांची ओळख त्यांच्या सामायिक मैत्रीण शर्वरी लोहकरेमुळे झाली. “आई” या मालिकेच्या निमित्ताने एका पार्टीत त्यांची पहिली भेट झाली आणि याच भेटीतून त्यांच्या मैत्रीची सुरुवात झाली.
सुरुवातीला साध्या गप्पांपासून सुरू झालेला संवाद हळूहळू प्रेमात बदलला. जवळपास दीड वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर शंतनू मोघे यांनी तुळजापूरमध्ये अगदी फिल्मी स्टाईलमध्ये प्रियाला लग्नाची मागणी घातली. त्यांच्या नात्याला दोन्ही घरच्यांचा होकार मिळाला आणि 24 एप्रिल 2012 रोजी या सुंदर जोडप्याचा थाटात विवाहसोहळा पार पडला. प्रिया, ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांची सून झाली.
लग्नानंतरही प्रिया सोशल मीडियावर सक्रिय राहून शंतनूसोबतचे खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करायची. त्यांचे फोटो, व्हिडीओ पाहून चाहत्यांना हे जोडपे नेहमीच “क्यूट कपल” वाटायचे.
तथापि, या सुंदर नात्याला काळाने गाठलं आणि प्रियाच्या निधनाने या नात्यावर दुःखाचा डाग उमटला. प्रिया मराठेच्या अभिनयाची गोडी, तिच्या मोहक स्मितहास्याची आठवण प्रेक्षकांच्या मनात कायम राहणार आहे.