प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचं ३८व्या वर्षी निधन, कॅन्सरशी झुंज हरली



मराठी मनोरंजन क्षेत्रातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचं अल्पवयात निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या, मात्र अखेर त्यांनी या आजारापुढे हार मानली.

प्रियाच्या अकाली निधनाने मराठी चित्रपटसृष्टी आणि लहान पडद्यावरील कलाकारांमध्ये शोककळा पसरली आहे. प्रेक्षकांनी आवडत्या कलाकाराला गमावल्याची हळहळ व्यक्त केली आहे.

अभिनय प्रवास

प्रिया मराठे यांचा जन्म २३ एप्रिल १९८७ रोजी ठाणे येथे झाला. त्यांनी २००६ मध्ये ‘या सुखांनो या’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पहिल्याच मालिकेतून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतल्यानंतर त्यांनी मराठी आणि हिंदी या दोन्ही मनोरंजन विश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.

मराठी मालिकांमध्ये त्यांनी ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये दमदार भूमिका केल्या. त्याचबरोबर ‘कॉमेडी सर्कस’ या कार्यक्रमातून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं.

हिंदी मालिकांमध्येही त्यांनी आपली छाप सोडली. ‘कसम से’, ‘पवित्र रिश्ता’, ‘बडे अच्छे लगते हैं’ या सुपरहिट मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. त्यांच्या सहजसुंदर अभिनयशैलीमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडली.

वैयक्तिक आयुष्य

प्रिया मराठे यांनी अभिनेता शंतनु मोघे यांच्याशी विवाह केला होता. शंतनु मोघे यांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. मराठी अभिनय क्षेत्रातील एक सुंदर आणि लोकप्रिय जोडपं म्हणून प्रिय आणि शंतनु यांच्याकडे पाहिलं जात होतं.

चाहत्यांमध्ये शोककळा

प्रियाच्या निधनाची बातमी समजताच सोशल मीडियावर चाहत्यांनी श्रद्धांजलीचा वर्षाव केला आहे. अनेकांनी त्यांच्या उत्तम अभिनय आठवत भावनिक पोस्ट्स शेअर केल्या आहेत. मराठीसह हिंदी मालिकांमधील चाहत्यांसाठी त्यांचं जाणं ही मोठी पोकळी निर्माण करून गेलं आहे.

मनोरंजन क्षेत्राला आयुष्याच्या उंबरठ्यावर गमावलेल्या या कलाकाराच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे.


Leave a Comment