टीम इंडियाचा दमदार फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) सध्या केरळ क्रिकेट लीग (KCL) मध्ये धडाकेबाज खेळी करत आहे. आशिया कपपूर्वी त्याने आपल्या बॅटमधून असा परफॉर्मन्स केला आहे की सर्व विरोधी संघांनी सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
तिरुवनंतपुरममध्ये झालेल्या थ्रिसूर टायटन्सविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसनने 46 चेंडूंमध्ये 89 धावा ठोकल्या. त्याच्या खेळीत 4 चौकार आणि तब्बल 9 षटकारांचा समावेश होता. 193 पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने खेळत त्याने आपल्या संघाला 20 षटकांत 188/7 अशी भक्कम धावसंख्या उभारून दिली.
एका बॉलमध्ये 13 धावा!
या सामन्यातील सर्वात मोठा क्षण म्हणजे सॅमसनने एका चेंडूवर तब्बल 13 धावा केल्या. पाचव्या षटकात स्पिनर सिजोमोन जोसेफचा नो-बॉल त्याने कव्हरच्या दिशेने षटकारासाठी पाठवला. त्यानंतर फ्री-हिटवर पुन्हा मोठा षटकार ठोकत त्याने प्रेक्षकांना थक्क केलं.
जबरदस्त पुनरागमन
स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात केवळ 13 धावा काढल्यानंतर, संजूने दुसऱ्या सामन्यात एरीस कोल्लम सेलर्सविरुद्ध 121 धावा झळकावत दमदार पुनरागमन केलं होतं. आता तिसऱ्या सामन्यात त्याने हाफ सेंच्युरीसह आपला फॉर्म कायम ठेवला आहे.
आतापर्यंतच्या तीन सामन्यांत त्याने 74.33 च्या सरासरीने आणि 187 च्या स्ट्राइक रेटने 223 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे.
आशिया कपपूर्वी मोठा इशारा
भारतासाठी खेळताना सॅमसनने आधीच दमदार कामगिरी दाखवली आहे. त्याच्या 42 T20I सामन्यांत 861 धावा असून तीन शतकं आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. गेल्या वर्षी तो भारताचा सर्वाधिक यशस्वी T20I फलंदाज ठरला होता.
आता आशिया कपपूर्वीचा हा फॉर्म पाहता भारतासाठी ही मोठी खुशखबर आहे. भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी यूएई विरुद्ध, तर 14 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध हाय-व्होल्टेज सामना दुबईत होणार आहे. सॅमसनने जर हाच फॉर्म कायम ठेवला, तर आशिया कपमध्ये टीम इंडियासाठी तो गेम-चेंजर ठरू शकतो.