Trump Tariff : अमेरिकेने भारतावर लावलेला 50% टॅरिफ लागू, निर्यातीवर मोठा फटका



मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेला अतिरिक्त 25% टॅरिफ बुधवार, 27 ऑगस्टपासून अधिकृतपणे लागू झाला आहे. होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंट (DHS) ने 26 ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी करत याची घोषणा केली होती. या नव्या निर्णयामुळे भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या उत्पादनांवरील एकूण टॅरिफ दर आता 50% पर्यंत पोहोचले आहेत.

तज्ज्ञांच्या मते, या निर्णयाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सचे कार्यकारी सदस्य आणि ऊर्जा समितीचे अध्यक्ष सुनील जैन यांनी सांगितले की, या टॅरिफमुळे 40 ते 50 अब्ज डॉलर्सपर्यंतची भारतीय निर्यात प्रभावित होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम देशाच्या GDP वर होईल आणि सुमारे 1.5% ते 2% घसरण अपेक्षित आहे.

भारतीय निर्यात अमेरिकन बाजारपेठेत स्पर्धात्मक राहणे कठीण होईल, कारण ट्रम्प प्रशासनाने भारताच्या प्रतिस्पर्धी देशांवर तुलनेने कमी टॅरिफ लावला आहे. इंडोनेशिया, बांगलादेश, तुर्की आणि पाकिस्तान यांना या निर्णयाचा तुलनेने कमी फटका बसणार आहे. त्यामुळे भारतीय वस्तूंची मागणी अमेरिकन बाजारात कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भारतीय अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलर्सच्या जवळपास असली तरी निर्यात क्षेत्रावर तात्पुरता दबाव येऊ शकतो. यामुळे सरकारने विशेष मदत पॅकेज जाहीर करून उद्योगांना आधार द्यावा, अशी मागणी तज्ज्ञांकडून होत आहे.

ट्रम्प यांनी या टॅरिफची घोषणा दोन टप्प्यांत केली होती. पहिल्या टप्प्यातील 25% टॅरिफ 7 ऑगस्टपासून लागू झाला होता. दुसऱ्या टप्प्यातील अतिरिक्त 25% टॅरिफ 27 ऑगस्टपासून लागू झाले आहे. हा निर्णय रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्यामुळे घेण्यात आला असल्याचे अमेरिकन प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

भारतीय निर्यातदारांसाठी हा मोठा धक्का मानला जात असून, पुढील काही महिन्यांत या टॅरिफच्या परिणामांवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे ठरणार आहे.


Leave a Comment