2011 चा आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक मानला जातो. तब्बल 28 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर टीम इंडियाने श्रीलंकेला पराभूत करून विश्वचषक जिंकला. या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने केलेल्या नाबाद 91 धावांची. पण धोनीला युवराज सिंगऐवजी वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यामागचं रहस्य नुकतंच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने उघड केलं आहे.
सचिननं Reddit वरील ‘Ask Me Anything’ सत्रादरम्यान एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना हा किस्सा सांगितला. त्याने स्पष्ट केलं की, “धोनीला वर पाठवण्यामागे दोन महत्त्वाची कारणं होती. पहिलं म्हणजे, उजवा-डावा फलंदाज कॉम्बिनेशन ठेवल्यामुळे श्रीलंकेच्या दोन प्रमुख ऑफ-स्पिनर्सना – मुथय्या मुरलीधरन आणि सूरज रणदिव – त्रास झाला असता. आणि दुसरं म्हणजे, धोनीनं 2008 ते 2010 दरम्यान चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळताना मुरलीधरनविरुद्ध नेट्समध्ये बराच सराव केला होता. त्यामुळे त्याला मुरलीधरनचा सामना करण्याचा अनुभव होता.”
सचिनच्या या रणनीतीमुळे धोनी वरच्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि 79 चेंडूत नाबाद 91 धावा करून भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. शेवटी गौतम गंभीर आणि धोनीच्या भागीदारीनं भारतानं 6 विकेट्स राखून ऐतिहासिक विजय मिळवला.
या विजयामुळे सचिन तेंडुलकरचं 22 वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं. हा त्याचा शेवटचा विश्वचषक होता आणि त्याने स्पर्धेत एकूण 482 धावा केल्या होत्या, ज्यात दोन शतकं आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. भारताकडून तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.
धोनीला वर पाठवण्याचा हा निर्णय भारतीय क्रिकेटच्या इतिहासात “गेम चेंजर” ठरला, असं आता निश्चितपणे म्हणता येईल. सचिनच्या सूचनेमुळेच भारतानं 28 वर्षांची प्रतीक्षा संपवून विश्वविजेतेपदाची कमान आपल्या खांद्यावर घेतली.