नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य ग्राहकांसाठी केंद्र सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. अन्नधान्य आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील वस्तू आणि सेवा कर (GST) कमी करण्याचा निर्णय लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. २२ सप्टेंबरपासून नवरात्र सुरू होत असून त्याच दिवशी हे नवे जीएसटी दर लागू करण्याची सरकारची योजना आहे.
GST परिषदेची बैठक ३-४ सप्टेंबरला
केंद्र सरकारने जीएसटी कौन्सिलची पुढील बैठक ३ आणि ४ सप्टेंबर रोजी दिल्लीत बोलावली आहे. या बैठकीत पुढील पिढीतील जीएसटी सुधारणांवर चर्चा होणार असून दोनच स्लॅब (५% आणि १८%) ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सध्या अस्तित्वात असलेले चार स्लॅब (५%, १२%, १८% आणि २८%) रद्द करून त्यात साधेपणा आणण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.
कोणत्या वस्तूंवर कमी होणार GST?
- १२% कर असलेल्या ९९% वस्तू आता ५% स्लॅबमध्ये जातील
- २८% स्लॅबमधील ९०% वस्तू १८% स्लॅबमध्ये येतील
- लक्झरी वस्तू, महागड्या कार, तंबाखू आणि हानिकारक वस्तूंवर ४०% कर लागू राहील
यामुळे सामान्य कुटुंबांच्या दैनंदिन खर्चात थेट बचत होणार आहे. भाजीपाला, अन्नधान्य, पॅकबंद वस्तू, आरोग्य व जीवन विमा यांसारख्या महत्त्वाच्या सेवाही ५% स्लॅबमध्ये येण्याची शक्यता आहे.
नवरात्रीत खरेदीला चालना
सरकारचा उद्देश सणासुदीच्या खरेदीला चालना देण्याचा आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी दरकपात लागू झाल्यास ग्राहकांना मोठा फायदा मिळेल आणि बाजारपेठेत उत्साह निर्माण होईल. विशेषतः ऑटोमोबाईल, उपभोग्य वस्तू आणि किराणा क्षेत्राला याचा फायदा होईल.
निवडणुकीशी संबंध?
सूत्रांच्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेरीस बिहार विधानसभा निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्याआधी सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने सरकार ही घोषणा करू शकते, असेही सांगण्यात येत आहे.
ग्राहकांसाठी मोठा दिलासा
या निर्णयामुळे महागाईतून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दैनंदिन वस्तूंवरील GST कपात झाल्यास थेट घरखर्च कमी होईल आणि सणासुदीच्या काळात ग्राहकांना जास्तीत जास्त खरेदी करण्याची संधी मिळेल.