सातारा/सांगली, दि. 19 ऑगस्ट 2025 – कोयना व वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने धरण प्रशासनाकडून पाणी विसर्ग वाढवण्यात आला आहे.
कोयना धरणातून आज (दि. 19 ऑगस्ट) रात्री 8.00 वाजता सहा वक्र दरवाजे 12 फुटांवरून 13 फुटांपर्यंत उघडण्यात आले. त्यामुळे तब्बल 93,200 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. याशिवाय पायथा विद्युतगृहाच्या दोन्ही युनिटमधून 2,100 क्युसेक विसर्ग सुरू असून एकूण 95,300 क्युसेक विसर्ग नदीत सोडला जात आहे.
दरम्यान, वारणा धरण क्षेत्रात देखील पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्याने विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणातील वक्र द्वारातून सोडला जाणारा विसर्ग 34,732 क्युसेकवरून वाढवून 38,350 क्युसेक करण्यात आला आहे. तसेच विद्युतगृहातून 1,630 क्युसेक पाणी सोडण्यात येत असून, एकूण 39,980 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडला जात आहे. पाऊस कायम राहिल्यास आणि येव वाढल्यास हा विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे.
या दोन्ही धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत नदीकाठी अनावश्यकपणे न जाण्याचे आवाहन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधण्याची सूचना करण्यात आली आहे.